नेशनल पार्कमध्ये धडक कारवाई: केंद्रीय समिती सदस्य सुधाकरसह ७ माओवादी ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीजापूर | १० जून – छत्तीसगडच्या अतिदुर्गम नेशनल पार्क जंगल परिसरात सुरक्षा दलांनी मोठा माओवादीविरोधी मोर्चा राबवत सीपीआय (माओवादी)च्या केंद्रीय समितीचे सदस्य गौतम ऊर्फ सुधाकर, तेलंगणा समिती सदस्य भास्कर राव यांच्यासह एकूण सात माओवादी ठार केले. ही कारवाई माओवादी चळवळीच्या सर्वोच्च नेतृत्वावर तडाखा देणारी ठरली आहे.

ही चकमक ५ ते ७ जून दरम्यान सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग होती. डीआरजी बीजापूर व दंतेवाडा, एसटीएफ आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी संयुक्तपणे नेशनल पार्क भागात धडक कारवाई केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, या भागात काही वरिष्ठ माओवादी नेत्यांची उपस्थिती असल्याच्या गुप्त बातम्या होत्या.

प्रमुख माओवादी ठार; शस्त्रसाठा हस्तगत…

खात्मा केलेले नक्षल : गौतम ऊर्फ सुधाकर (६७) – केंद्रीय समिती सदस्य, मूळ राहिवासी आंध्र प्रदेश, ₹४० लाखांचे बक्षीस.

भास्कर राव (४५) – तेलंगणा राज्य समितीचे विशेष सदस्य, ₹२५ लाखांचे बक्षीस.

रैनी – एसीएम, बीजापूर.

सुदरू पुनेम – सुधाकरचा अंगरक्षक.

महेश कुडियम – पक्ष सदस्य, फरसेगड, बीजापूर.

व एक अनोळखी महिला व पुरुष माओवादी.

घटनास्थळी एके-४७ रायफल (२), बीजीएल लाँचर (२), .३०३ रायफल, ३१५ बोर रायफल, १२ बोर कट्टा, तसेच मोठ्या प्रमाणात स्फोटके व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई; सुरक्षा दलांचा निर्णायक मारा..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी संयुक्त पथक जंगलात दाखल झाल्यानंतर माओवाद्यांनी ६ जूनला पहाटे गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करत सात माओवादी कंठस्नान केले.

त्यापैकी गौतम ऊर्फ सुधाकर हा अनेक हिंसक घटनांचा सूत्रधार मानला जात होता. तो माओवादी संघटनेच्या Revolutionary Political School (RePOS) चा प्रमुख होता. आदिवासी तरुणांना भडकवून हिंसेकडे वळवणाऱ्या माओवादी प्रचारयंत्रणेचा तो प्रमुख चेहरा होता.

माओवादी चळवळीवर वज्राघात…

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ पासून आतापर्यंत बीजापूर जिल्ह्यात १८४ माओवादी ठार, ७४९ अटक व ४१६ माओवादी आत्मसमर्पण झाले आहेत. ही आकडेवारी शासनाच्या पुनर्वसन धोरणाचा प्रभाव दर्शवते.

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी स्पष्ट केले की, गेल्या १७ महिन्यांत ४०९ हार्डकोर माओवादी ठार करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या धोरणांना स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळत असून, सुरक्षा यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.

नेशनल पार्क क्षेत्र – माओवादींचा उधळलेला बालेकिल्ला..

नेशनल पार्क हा भाग माओवादी नेत्यांचा सुरक्षित आश्रय मानला जात होता. या भागात आता सुरक्षा छावण्या उभ्या राहात आहेत, रस्ते बांधले जात आहेत आणि आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे माओवादी पायाभूत गमावत असून चळवळीची पकड कमकुवत होत आहे.

ही कारवाई म्हणजे केवळ माओवाद्यांच्या उपस्थितीवर न घाबरता त्यांच्या मुळावर घाव घालण्याचे उदाहरण आहे. सुरक्षा दलांच्या या कारवाईमुळे माओवादी चळवळीवरचा दबदबा खिळखिळा झाला असून, पुढील काळात या भागात शांततेचे वारे वाहतील, अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.

 

bijapur naxal attackChhatisgarhNational park encounternaxal encounter