अंड्यांचे भाव पुन्हा घसरले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 14 जानेवारी:- कोरोनाच्या संकटाचा शेवट जवळ आला असताना आता नव्या संकटाने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात ‘ बर्ड फ्लू ‘ या साथीच्या आजाराने शिरकाव केला आहे. देशातील दहा राज्यात बर्ड फ्लूची प्रकरण आढळली आहेत. बर्ड फ्लू आता दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यातही दाखल झाला आहे. यापूर्वीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाला होता. बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
‘2019 पासून कुक्कुटपालकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आधी कोरोना, आता बर्ड फ्लूच्या बातमीने या उद्योगाला वाईट स्थितीत आणले आहे. दररोज लाखो अंडी साठून राहत आहेत. परंतु, ही अंडी साठवून देखील ठेवू शकत नाही अशा अवस्थेत शेतकरी अडकले आहेत. यावर उपाय म्हणून ते एकतर अगदी कमी किंमतीत अंड्यांची विक्री करत आहेत किंवा ही अंडी जमिनीत पुरत आहेत.’
अंड्यांच्या किंमती सातत्याने घसरत आहेत. गुरुवारी अंड्यांचा दर 295 रुपये प्रति शेकडावर आला आहे. त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसायिकांकडून अंडी अडीच ते तीन रुपयांत खरेदी केली जात आहे. तथापि, त्याची सद्य किंमत 3.5 ते 4 रुपये इतकी आहे.