विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला आग लागल्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई दि.24 एप्रिल :- विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयातील आय सी यु युनिटला लागलेल्या आगीत एकूण 15 जण होरपळून मृत्यूमुखी पडले ही अत्यंत गंभीर दुःखद घटना आहे. या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार ने जाहीर केली असली तरी या विदारक अग्निकांडाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आपली आग्रही मागणी असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.
आज सकाळी त्यांनी विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.या रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील इंटेसिव्ह केयर युनिटला आग लागल्याने हे युनिट बेचिराख झाले आहे. त्या ठिकाणी ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण आयसीयू जळून खाक झाले आहे.तेथील 13 रुग्ण जागीच होरपळून मृत्युमुखी पडले तर अन्य दोन रुग्ण त्यांना अन्य वॉर्ड मध्ये हलविताना मृत्यू पावले. ही अत्यंत दुःखद घटना असून ही बातमी राष्ट्रीय बातमी नाही असे राजेश टोपे यांचे म्हणणे या दुर्घटनेचे गांभीर्य नाकारणारे आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.

रुग्णालयांना आग लागण्याच्या राज्यात अनेक घटना घडू लागल्या आहेत.त्यामुळे राज्य सरकार ने याकडे गांभीर्याने पाहून सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून पुन्हा राज्यात कोणत्याही रुग्णलयाला आग लागणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. रुग्णालयांना आग लागण्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच यात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केलेली टीका चुकीची आहे. रुग्णालयाला आग लागण्याच्या घटनेत केंद्र सरकार ची काहीही चूक नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रुग्णालयांत आग लागू नये याची खबरदारी घ्यावी; रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत ; राज्यात कोरोना रोखण्यास राज्य सरकार कमी पडले आहे त्यामुळे नाना पटोले उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागतील का? असा सवाल ना रामदास आठवले यांनी यावेळी केला.

राज्यात रेडिमिसिविर इंजेक्शन ;ऑक्सिजन अधिक मिळवून देण्यासाठी आपण केंद्र सरकार कडे प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइं चे काकासाहेब खंबाळकर; ऍड ईश्वर धुळे: चंद्रशेखर कांबळे आदी रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते.तसेच तहसीलदार उज्वला भगत ; अतिरिक्त मनपा आयुक्त आशिष पाटील; सहाय्यक आयुक्त अंगाई भुसे ;डॉ राजेश चव्हाण; आदी मान्यवर उपस्थित होते.