लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये मुक्तीपथच्या मार्फतीने बाराही तालुक्यात व्यसन उपचार तालुका क्लिनिकची सोय उपलब्ध आहे. या आठवड्यात विविध क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेत दारूचे व्यसन आजार बनल्याची खंत ३६ रुग्णांनी व्यक्त केली.
दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार आहे. नियमित दारूचे सेवन करणाऱ्यांना शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. यावर उपचार घेणे गरजेचे असते, परंतु गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यात व्यसन उपचाराची सोय उपलब्ध नसल्याने अनेकांची हेळसांड होत होती. त्यामुळे मागील काही वर्षांपासून मुक्तिपथने तालुका पातळीवर नियोजित दिवशी व्यसन उपचार तालुका क्लिनिकची सोय उपलब्ध करून दिली आहे. या क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञ समुपदेशकांकडून दारू सोडण्यासाठी योग्य उपाययोजना सुचवून योग्य सल्ला दिला जातो. सोबतच औषोधोपचार देखील केला जातो. नुकतेच गडचिरोली तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण १४, एटापल्ली १४ तसेच चामोर्शी येथील क्लिनिकमध्ये ८ अशा एकूण ३६ रुग्णांनी लाभ घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.