नांदेड मध्ये भाजपा आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्याने एकच खळबळ

रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

राज्यात विधानसभा  निवडणुकीला रंग चढला असून विविध राजकीय पक्षाकडून  प्रचाराच्या तोफा धडाडत आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने आमदार, नेते आणि कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. राज्यात बड्या नेत्यांच्या सभांना तुफान गर्दी होत आहे. त्यांची वक्तव्ये आणि विधानांमुळे कुठे गौप्यस्फोट होत आहे तर कुठे एकमेकांवर चिखलफेक करण्यात येत आहे. एकंदरीतच राजकीय वातावरण तापले असून  सभा, मेळावे, कोपरा बैठक घेताना काही नेत्यांचा संयम सुटत असल्याचे दिसत आहे. काहीची जीभ घसरल्याने ऐन प्रचारात वाद ओढावून घेण्याची नामुष्की काही नेत्यांवर आली आहे. काही जण कृतीतून वादात ओढावून घेत आहेत. तर काही नेते जीभेवर ताबा नसल्याने वादात अडकले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदार संघातील बोथाडी  गावात सायंकाळची सभा होण्यापूर्वी गावातील काही तरुणांनी निवडणुकीच्या वेळीच यांचे दर्शन होत असल्याचा चिमटा काढला होता. तर काहींनी तुम्ही गावात येत नसल्याची नाराजी व्यक्त केली होती.या तरुणांवर नाराजी व्यक्त करण्याच्या नादात   किनवटचे भाजपा आमदार भीमराव केराम यांचा तोल सुटला आणि असेच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या मतदारसंघातील बोधडी येथे प्रचारसभेसाठी गेले होते. सायंकाळी गावात त्यांची प्रचार सभा होती. त्यावेळी त्यांनी भाषणात बोलताना  रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? असा सवाल केला. त्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली. आमदार महोदयांनी असं वक्तव्य केल्याने अनेकांनी आमदारांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मंत्रालयात निधी मिळवण्यासाठी फिरावे लागते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तेव्हा कुठे गावाच्या विकासाला निधी मिळतो अशी सारवासारव त्यांनी लागलीच केली. यावेळी सभा स्थानी माजी मंत्री पंकजा मुंडे या सुद्धा होत्या.  याप्रकारामुळे  महायुतीचे भाजपा आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.