शिवजयंतीदिनी बालके रमली चित्रकलेच्या अनोख्या विश्वात

वारली चित्रकलेचे धडे : किलबिल नेचर क्लबच्या वतीने ‘शिवोत्सव : रंगोत्सव‘ उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, ता. १९  फेब्रुवारी : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बालकांसाठी निसर्ग चळवळ चालविणाऱ्या किलबिल नेचर क्लबच्या वतीने शनिवार ता. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘शिवोत्सव : रंगोत्सव‘ या उपक्रमात सहभागी बालके चित्रकलेच्या अनोख्या विश्वात रमली.

स्थानिक वसंत विद्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. चित्रकार अनिल बारसागडे यांच्या क्रिएटिव्ह आर्ट अकॅडमी संस्थेने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले, बोधराज इटनकर, कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयाचे मानस शास्त्रज्ञ शशिकांत शंकरपुरे, मानद वन्यजीवरक्षक मिलिंद उमरे, क्रेन्स संस्थेच्या सचिव तथा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगशिक्षिका अंजली कुळमेथे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी छायाचित्रकार सुभाष धंदरे, वसंत विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पोरेड्डीवार, शिक्षिका मीरा बिसेन, कामडी, सुरपाम, शिक्षक समरीत, उमरे, काटेंगे, रामटेके, लांजेवार, नंदूरकर, धाईत, वरखडे, विद्याभारती विद्यालयाच्या शिक्षिका प्रतिभा रामटेके, डॉ. तृप्ती शंकरपुरे, प्रा. डॉ. योगेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर चित्रकार अनिल बारसागडे यांनी अवघ्या एका तासात विद्यार्थ्यांना वारली चित्रकलेचे धडे दिले. आधी कागदावर सराव केल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट शाळेच्या भिंतींवर आधी पेन्सिलने रेखाचित्रे काढली.

त्यानंतर अ‍ॅक्रेलिक पेंट व ब्रशच्या साहाय्याने वारली चित्रे रंगवायला सुरुवात केली. वारली आदिवासी संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये असलेल्या झोपड्या, ताडीचे व इतर वृक्ष, वाघ, हत्ती, हरणासारखे प्राणी, कोंबडे, चिमणी व इतर पक्षी, घोड्यावर निघालेली वरात, जात्यावर दळणारी स्त्री, सामूहिक रेला नृत्य, वाद्य वादन करणारा पुरुष अशा अनेक रेखाकृती काढून त्या रंगविल्या. जवळपास तीन ते चार तास विद्यार्थी शाळेच्या भिंतींवर वारली चित्रे काढण्यात मग्न झाले होते.

त्यांना चित्रकार बारसागडे तसेच वसंत विद्यालयाच्या शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. या उपक्रमात वसंत विद्यालयासोबतच विद्याभारती विद्यालय, राजे भगवंतराव हिंदी विद्यालय, पं. जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या शाळांतील किलबिल नेचर क्लबचे सदस्य असलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिरासाठी वसंत विद्यालयाचे गोन्नाडे, सिडाम तसेच खुशाल ठाकरे आदींनी सहकार्य केले.

बोलक्या झाल्या भिंती…

कोणत्याही शाळांच्या भिंती असोत त्यावर जोपर्यंत चित्रे दिसत नाहीत तोपर्यंत त्या जिवंत वाटत नाहीत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसंत विद्यालयाच्या भिंतींवर वारली जमातीच्या आदिवासी संस्कृतीचे कलात्मक विश्वच किलबिल नेचर क्लबच्या बाल सदस्यांच्या कुंचल्यातून प्रकट झाले. त्यामुळे या भिंती खऱ्या अर्थाने विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून बोलक्या झाल्या.

हे देखील वाचा : 

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

शिवजंयती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तलवारीवर शिवसृष्टी..

देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण

 

 

lead news