लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: तलावाचे सौंदर्गीकरण करणार, पर्यटनाची सोय होणार, अशी स्वप्ने गडचिरोलीकरांना दाखवून १५ वर्षांपूर्वी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील गोकुलनगर लगतच्या मुख्य तलावाच्या सौंदर्गीकरणाचे काम हाती घेण्यात आले. आतापर्यंत ४ कोटींपेक्षा अधिकचा निधी खर्च करण्यात आला. आहे. गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुख्य तलावाच्या सौंदर्याकरणासाठी मामा तलाव योजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूरी प्रदान करण्यात आली. मात्र अजूनही या तलावाचे रूप पालटले नसल्याने हा खर्च व्यर्थ गेल्याचे निदर्शनास येत आहे. तलाव सौंदर्गीकरणाचे काम थंडबस्त्यात पडण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न शहरवासींकडून उपस्थित केला जात आहे.
कामाच्या देखरेखीची जबाबदारी जलसंपदा विभागाकडे सोपवलेली होती. सदर तलावाच्या सौंदर्याकरणासाठी चार कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले होते. याअंतर्गत तलाव सौंदर्गीकरणाचे कामही हाती घेण्यात आले. परंतु अद्यापही तलाव सौंदर्गीकरणाचे काम पूर्णत्वास आलेले नाही. या कामावर आतापर्यंत चार कोटींपेक्षा अधिकचा निधी खर्च झाला असताना तलाव सौंदर्गीकरण न झाल्याने संबंधित विभागाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या स्तुत्य उद्देशातून तलावाच्या सौंदर्गीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हे तलाव सौंदर्गीकरणाचे काम थंडबस्त्यात पडलेले आहे.