सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ वर्गवारीत महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम

"महाराष्ट्राची जैवविविधता व जैव मानके यावर आधारित होता चित्ररथ".
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ४ फेब्रुवारी : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील राजपथावर झालेल्या संचलनात, महाराष्ट्राच्या चित्ररथाला; देशात सर्वात जास्त लोकप्रियता मिळून, सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या या संचलनात विविध बारा राज्यांच्या चित्ररथांचे संचलन झाले होते. यावर्षी प्रथमच केंद्र सरकारने लोकप्रियतेच्या आधारावर सर्वाधिक लोकप्रिय पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते.

केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, २६ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. लोकप्रिय चित्ररथ या वर्गवारीत प्रेक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने आवडत्या चित्ररथास मतदान करावयाचे होते. या मतदानात महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक पसंती मते मिळाली तर उत्तर प्रदेशला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक बिभीषण चवरे यांनी या चित्ररथाची निर्मिती केली होती. या चित्ररथासाठी गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता तर अमर देसाई यांनी संगीत दिलेले हे काव्य बिभीषण चवरे यांनी लिहिले होते तर संगीत संकल्पना मीनल जोगळेकर यांची होती. या चित्ररथावर कोणत्या वनस्पती, प्राणी व स्थळे यांचा समावेश करावयाचा, यावर विविध तज्ञांशी चर्चा करून संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी संशोधन केले होते. नागपूरच्या शुभ आर्ट्स या संस्थेने चित्ररथ बांधणी केली होती.

महाराष्ट्र राज्याने यावेळेस महाराष्ट्रातील समृद्ध जैवविविधता व राज्याने घोषित केलेली पाच मानके यावर आधारित आकर्षक चित्ररथ तयार केला होता. राज्य फुलपाखरू ब्लू मोर्मोर्न, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्यवृक्ष आंबा आणि राज्य फूल ताम्हण यांसह राज्यातील १५ दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण पशुपक्षी, २० वनस्पतींसह कास पठार आणि अंबोलीचा धबधबा यांना स्थान दिले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशातील प्रेक्षकांच्या पसंतीची सर्वाधिक मते मिळाल्यामुळे राज्याला लोकप्रिय श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मतदान करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तसेच पर्यावरणासारखा अतिशय महत्वाचा विषय उत्कृष्टरित्या देशाच्या राजधानीत राजपथावर साकार केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर दोघांचा चाकूने प्राणघातक हल्ला

खोटे लग्न लावून देऊन तरूणाची फसवणूक; पाचजणांवर गुन्हा दाखल

 

lead news