लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्याकरिता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या वणीमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. वणीमधील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्या. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केला.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यास आमचा आक्षेप नाही. परंतु निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.