बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना जाण्यापासून रोखलं

प्रतिभा पवार नात रेवती सुळे यांच्यासोबत खरेदीसाठी टेक्स्टाईल पार्कला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

प्रतिभाताई पवार त्यांच्या नात रेवती सुळे यांचे सोबत बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये दोन्ही जण खरेदीसाठी गेले होते. पण टेक्स्टाईल पार्कच्या गेटवरच प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना रोखण्यात आलं. जवळपास अर्धा तास दोघांना गेटवरच थांबवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास गेटवर थांबवण्यात आलं.  प्रतिभा पवार यावेळी आपल्याला प्रवेश का दिला जात नाही? असा प्रश्न तेथील सुरक्षा रक्षकाला विचारतात. त्यावेळी आपल्याला वरिष्ठांकडून कोणतीही गाडी आत सोडण्यास नकार देण्यात आल्याचं गेटवरील सुरक्षा रक्षक म्हणतो. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बारामतीत सध्या विधानसभा निवडणुकीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. इथे पवार कुटुंबातीलच दोन उमेदवार आमनेसामने आहेत. विशेष म्हणजे पवार काका-पुतण्यात ही लढाई आहे. शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही लढाई आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. ते बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जावून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर रेवती सुळे या देखील रस्त्यावर उतरुन युगेंद्र पवार यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे प्रतिभा पवार आणि रवेती सुळे यांना टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर अर्धा तास थांबवून ठेवण्यामागे निवडणुकीच्या राजकारणाची किनार असल्याची शक्यता आहे.

सुरक्षा रक्षकाला टेक्स्टाईल पार्क सुरु आहे का? असा प्रश्न विचारला असता, सुरक्षा रक्षक पार्क सुरु    असल्याचं म्हणतो. परंतु बारामती टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांनी गेटवरुन एकही गाडी आतमध्ये सोडू नये, असा आदेश दिल्याचे सांगितले. असं तो सुरक्षा रक्षक म्हणतो. त्यामुळे प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास का रोखण्यात आलं? याबाबत टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांच्याकडून काय स्पष्टीकरण येणार ते महत्त्वाचं ठरणार आहे.