पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क १४ डिसेंबर :- महाराष्ट्रातील क्रीडा वर्तुळातून एक धक्कादायक बातमी आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रीपती खंचनाळे यांचा जन्म १० डिसेंबर १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला होता. १९५९ मध्ये झालेल्या पहिल्या हिंद केसरी स्पर्धेत बनता सिंग यांना पराभूत करत श्रीपती खंचनाळे हे देशातील पहिले हिंद केसरी ठरले होते.

श्रीपती खंचनाळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं होतं. प्रकृती नाजूक झाल्यानं त्यांना कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. श्रीपती खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील होते.

त्यांनी 1951ला पंजाब केसरी बनता सिंग यांना पराभूत करून हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं. त्याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटात अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. या त्यांनी १९५८, १९६२, १९६५ या साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धा जिंकल्या आहेत.

श्रीपती खंचनाळे यांची कुस्तीतील जडण-घडण कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत झाली होती.त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे . त्यांचं पार्थिव शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.तिथून ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल.अशी माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे .

udhav thakre