लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोलीच्या मातीत उभा राहून आशेचा दिवा पेटवणारा एक डॉक्टर—डॉ. मनीष मेश्राम—हा त्या लढ्याचा खरा दीपस्तंभ ठरत आहे.एमपीएससी परीक्षेत यश मिळवून वर्ग-१ पल्मोनोलॉजिस्ट पदासाठी निवड होणे ही त्यांच्या कर्तृत्वाची अधिकृत पावती असली, तरी त्यांचा खरा सन्मान हा त्यांनी वाचवलेल्या प्रत्येक जीवात आणि त्या जीवांच्या डोळ्यांतील आश्रूंमध्ये दिसून येतो.वर्धा, नागपूर, मुंबईसारख्या मोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये समृद्ध अनुभव घेऊनही, महानगरातील सुसज्ज करिअरची संधी नाकारून गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्याची निवड करणं—ही केवळ नियुक्ती नव्हे, तर एक जाणीवपूर्वक घेतलेली सामाजिक बांधिलकी आहे. त्यांच्या कार्यात वैद्यकीय कौशल्याबरोबरच मानसशास्त्राची जाण, रुग्णांशी संवादाची संवेदनशीलता आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द दिसून येते…
गडचिरोली, : एकीकडे बदलती जीवनशैली, वाढती व्यसनाधीनता आणि त्यातून वाढणारे कर्करोगासारखे जीवघेणे आजार… तर दुसरीकडे त्या अंधारातही आशेचा दिवा पेटवणारी काही माणसं—गडचिरोलीच्या मातीने अशीच एक ओळख घडवली आहे, ती म्हणजे डॉ. मनीष मेश्राम. “कर्करोगमुक्त समाज घडवायचा असेल, तर औषधोपचारांपेक्षा जीवनशैलीत बदल हा सर्वात मोठा उपचार आहे,” असा केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक संदेश देत त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून उभारलेली कर्करोग जनजागृती मोहीम आज एक चळवळ बनत आहे
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही मोहीम आज गावागावात पोहोचत आहे. स्तनाचा कर्करोग असो, तोंडाचा कर्करोग असो किंवा इतर कोणताही आजार—लक्षणे ओळखणे, वेळेवर तपासणी करणे आणि भीतीवर मात करणे, हीच या मोहिमेची त्रिसूत्री ठरली आहे. “भीती नव्हे, जागरूकता हेच संरक्षण,” हा संदेश आता जनमानसात रुजत आहे.
परंतु या मोहिमेची खरी ताकद केवळ कार्यक्रमात नाही, तर त्यामागे उभ्या असलेल्या व्यक्तिमत्त्वात आहे. कोरोना काळ हा आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात कठीण टप्पा मानला जातो. त्या काळात अनेकांनी भीतीपोटी जबाबदाऱ्यांपासून पळ काढला, तर काही ठिकाणी यंत्रणा कोलमडली. पण गडचिरोली आणि भामरागडच्या जंगलात, दुर्गम रस्त्यांवर, एका डॉक्टरने मात्र थांबण्याचा प्रश्नच उपस्थित केला नाही—तो म्हणजे डॉ. मनीष मेश्राम.
रात्र असो वा पहाट, पावसाचा मारा असो वा अंधाराची भीती—“रुग्ण वाचला पाहिजे” हा एकच मंत्र घेऊन ते धावत राहिले. श्वसनसंस्थेचे गंभीर आजार, आयसीयूतील लढाया, कर्करोगावरील केमोथेरपी, व्यसनमुक्ती उपचार, मानसिक आरोग्य—या सर्व आघाड्यांवर त्यांनी दिलेले योगदान हे केवळ सेवा नाही, तर हजारो कुटुंबांसाठी पुन्हा उभं राहण्याचं बळ ठरलं. त्यामुळेच आज गडचिरोलीत त्यांना ‘डॉक्टर’ म्हणून नव्हे, तर ‘देवदूत’ म्हणून ओळखलं जातं.
वर्धा, नागपूर, मुंबईसारख्या मोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये समृद्ध अनुभव घेऊनही, महानगरातील सुसज्ज करिअरची संधी नाकारून गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्याची निवड करणं—ही केवळ नियुक्ती नव्हे, तर एक जाणीवपूर्वक घेतलेली सामाजिक बांधिलकी आहे. त्यांच्या कार्यात वैद्यकीय कौशल्याबरोबरच मानसशास्त्राची जाण, रुग्णांशी संवादाची संवेदनशीलता आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द दिसून येते.एमपीएससी परीक्षेत यश मिळवून वर्ग-१ पल्मोनोलॉजिस्ट पदासाठी निवड होणे ही त्यांच्या कर्तृत्वाची अधिकृत पावती असली, तरी त्यांचा खरा सन्मान हा त्यांनी वाचवलेल्या प्रत्येक जीवात आणि त्या जीवांच्या डोळ्यांतील आश्रूंमध्ये दिसून येतो.
दरम्यान, वाढत्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशन व्यवस्था बळकट करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नव्हे, तर मानसिक आधार मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी दिला.
आज गडचिरोली ‘स्टील हब’ म्हणून देशाच्या विकास नकाशावर उभा राहत असताना, त्या विकासाला खरी धार देणारे घटक म्हणजे आरोग्य आणि मानवी संवेदना. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या विकासाची दिशा दिली, त्या दिशेला गती देण्यासाठी अशा कर्तव्यदक्ष डॉक्टरांची गरज अधिक अधोरेखित होते. प्रशासनाने योग्य वेळी योग्य व्यक्तींना योग्य जबाबदारी दिल्यास, गडचिरोली केवळ औद्योगिक नव्हे, तर आरोग्य क्षेत्रातही आदर्श ठरू शकतो…