आणि जेव्हा हत्ती सोंडेच्या सहाय्याने बोरवेलचा दांडा हलवून पाणी काढतो तेव्हा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला आहे. पर्यावरणाचा महत्वाचा वन्यप्राणी हा घटक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नावाजलेल्या कमलापूर हत्ती कॅम्प हा राज्यातील पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. या ठिकाणी आजच्या घडीला ९ हत्ती आहेत. असाच एका हत्तीचा येथील बोरवेलचा दांडा सोंडेच्या सहाय्याने हलवून पाणी काढतांनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

विविध हिंदी चित्रपटात हत्तीचे चित्रीकरण केले गेले आहे. सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा “हाथी मेरे साथी” हा चित्रपट ८० च्या दशकात सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात हत्तीला आपलेपणाची भावना देऊन तो माणसात कसा मिसळतो आणि आपल्या मालकाच्याप्रती त्याच्या कृतज्ञतेचे चित्रण केले गेले होते. विविध चित्रपटातही वेळोवेळी आपल्याला हत्ती दिसलेला आहे. लहान मुलांना हत्तीचे फार वेड असते. ऐवढा  मोठा अजस्त्र प्राणी दिसला की, बच्चे कंपनीची मौजच फिटते. त्यामुळे आबाल वृद्धांना हत्तीचे आकर्षण आधीपासूनच आहे. प्राचीन काळात राजे, रजवाडे युद्धाच्या वेळी हत्तीवर स्वार होऊन युद्ध करत होते. युद्धात विजय मिळाल्यानंतर हत्तीवर स्वार होऊन विजय मिरवणुका काढल्या जात होत्या.

देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून ऐरावत हा हत्ती निघाला होता. देवाचा राजा इंद्र हा ऐरावतावर बसून स्वारी करीत होता. त्यामुळे हत्तीचे पुरातन काळापासून महत्व आहे.

हत्ती हा तसा शांत प्राणी असला तरी काही प्रसंगी तो आक्रमक होत असतो. हत्ती हा शाकाहारी प्राणी असुन पाण्याचा त्याला खूप वेड आहे. त्यामुळे कित्येक तास हत्ती पाण्यात डूबुन असतात . पाण्यात हत्तीला मस्ती करणं फार आवडत. कमलापूर गावानजीक असलेल्या वनविभागाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या हत्तीकॅम्प मध्ये ९  हत्ती आहेत. लाकडांची ओढणावाळ करण्याची कामे माहुतांच्या इशारावर ते करतात. हत्तीकॅम्पच्या परिसरात मोठा तलाव असल्याने हत्तीचा नैसर्गिक अधिवासास हा परिसर पोषक आहे. त्यामुळे हत्तीने बोअरिंगचा दंडा हलवुन पाणी काढण्याचा व्हिडीओ  परिसरात औत्युस्कतेचा विषय ठरत आहे.

अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथिल वनविभागाच्या हत्तीकॅम्प मध्ये ९ हत्ती आहेत. यात ३ नर तर ६ मादा आहेत. त्यातील अर्जुन, अजित, गणेश, सई, बसंती, रूपा, मंगला असे त्यांचे नाव ही रंजक आहेत. त्यामुळे येथील हत्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कमलापूर येथे आरक्षित दाट जंगल असुन डोंगर दर्याने आणि निसर्गाने भरभरून नटलेला भूभाग आहे.

या ठिकाणी कोलामार्का क्षेत्रात विविध वन्यप्राणी पाहायला मिळतात तर याच भागात उत्कृष्ट सागवानही पाहायला मिळते. हा भाग डोंगर दर्याचा असल्याने आणि रस्ते नसल्याने गत १० वर्षा अगोदर जंगलातील लट्ठे, लाकुड, फाटे डोंगर दर्यातून ठरलेल्या ठिकाणी ठेवल्या जात होते. मात्र आता अपेक्षित जंगल असले तरीही अत्याधुनिक यंत्रणा आल्याने हत्तीचे लाकडे ओढण्याचे काम बंद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर आणि तेलंगाना राज्याच्या सिमेलगत असलेलं एकमेव वनविभागाचे हत्तीकॅम्प आहे. या ठिकाणी वनविभागाद्वारे योग्य ती खबरदारी घेत असल्याने हत्तीच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. एव्हढेच नव्हे तर निसर्गाने कमलापुरात भरभरून नैसर्गिक साधन संपत्तीही दिली आहे. या हत्तीकॅम्प जवळ मोठे तलाव असून या तलावात बाराही महिने पाणी उपलब्ध असते. शिवाय या तलावाच्या बाजूला आपण जर चहुबाजूने बघितलं तर नैसर्गिक डोंगर दर्याने मन मोहून नयनाचे पारने फिटतात. सध्या हत्तीकडे वनविभागाचे कर्मचारी विशेष लक्ष देत असुन आरोग्याची तपासणी वेळीच करून घेत आहेत.

                                                 कमलापूर येथील धबधबा

त्यामुळे आजही हत्ती आपल्याला सुदृढ, संपन्न दिसून येतात. विशेष म्हणजे या हत्तीचे  १० वर्षापासून काम बंद असले तरी वनविभागाने या ठिकाणी पर्यटनाचे दालन मोकळे केल्याने या ठिकाणी देशभरातून हत्ती पाहायला येणाऱ्या पर्यटकाच्या संख्येत मोठ्याने वाढ होत आहे.

कमलापूर या गावाचे हत्ती कॅम्पमुळे नाव लौकिक झाले असले तरी महाराष्ट्रातील नक्षलवाद्याचे “माहेर घर” म्हणूनही ओळख आहे. या भागात अधून मधून नक्षल्यांच्या विघातक कृत्य तर कधी हत्या, चकमक या घटना समोर येतच असतात. तरीही निसर्ग प्रेमी या हत्तीकॅम्पला भेट देऊन मनसोक्त, मनमुराद निसर्गाने दिलेल्या मोकळ्या श्वास आच्छादून घेतात.

या ठिकाणी हत्तीवर स्वारी करण्यासाठी मोठी आवड पर्यटकामध्ये दिसून येते. पर्यटकही हत्तीकॅम्पला जातांना हत्तीसाठी स्व:खर्चातून केळी, सफरचंद हे फळ व यासारख्या इतर वस्तू देत असल्याने हत्तीही पर्यटकाकडे जवळ जाऊन उभे राहत असतात. हत्तीला निर्देश देण्यासाठी माहूत सदैव सोबत असतो. त्यामुळे पर्यटकामध्ये सुरक्षितता पाहायला मिळते. हत्ती हा बुद्धिमान प्राणी असल्याने प्रशिक्षित केले आहे. त्यामुळे ते माणसाच्या छोट्या मोठ्या हालचालीही कृतीतून साकारत असतात.

कमलापूर येथील हत्तीकॅम्प पाहण्यासाठी व्यक्तिगत वाहनांची सोय करून यावे लागते. हत्तीकॅम्पचे आकर्षण वन्यजीव प्रेमी व पर्यटकांना आहे. मात्र हत्तीकॅम्पला पोहोचण्यासाठी थोडी कसरत करावी लागते. आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर रेपनपल्लीपर्यंत खासगी वाहनासह एसटी बसनेही पोहोचता येते. मात्र तेथून 9 किलोमीटर आत जाण्यासाठी एसटी बस नाही. तिथे खासगी वाहनानेच जावे लागते. रेपनपल्लीवरून स्पेशल ऑटोरिक्षाही करता येतो. सदर ठिकाणी वाहन उपलब्ध न झाल्यास ३ किलोमीटरवर असलेल्या कमलापूरला ऑटोने जाऊन तेथून हत्ती कॅम्पसाठी दुसरा ऑटो करावा लागतो.

८० वर्षाची हत्तीण १९६२ साली कमलापूरला पहिल्यादा आणण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षांनी आलापल्लीवरून एक हत्ती आणण्यात आले. आता त्यांचे कुटुंब चांगले विस्तारून ९ जणांचे झाले आहे. या कुटुंबातील पहिली हत्तीण आता जवळपास ८० वर्षांची झाली आहे. या वयोवृद्ध हत्तीणीपासून तर दिड वर्षाच्या छोट्या हत्तीपर्यंत सर्व वयोगटाचे हत्ती कमलापूरच्या हत्तीकॅम्पमध्ये पहायला मिळतात.

हे देखील वाचा :

पर्यावरणदिनी स्वयं रक्तदाता समिती तर्फे आयोजित शिबिरात १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीच्या वतीने वृक्षारोपण

मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

Gadchiroli TourismKamlapur Hatti Camplead story