गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २५ जानेवारी : गोंडवाना विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता (डिन) तथा चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथिल गोविंद प्रभू कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम कावळे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. श्रीराम कावळे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे १३ वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा दिल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या तळोधी (बा‌) येथे प्राचार्य पदावर रुजू झाले. प्राध्यापक व प्राचार्य पदावर सेवा देत असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे विविध प्राधिकरणावर काम केले आहे. गोंडवाना विद्यापीठात मागील पाच वर्षांपासून मानव विज्ञान विद्या शाखेच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.‌दरम्यान काळात गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्याकडे येथिल प्र- कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. सध्या ते गोंडवाना विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरु म्हणून सेवा देत आहेत.

डॉ. श्रीराम कावळे यांच्या अधिष्ठाता व प्र-कुलगुरु पदाच्या कार्यकाळात कोरोना सारखे संकट येऊनही ऑनलाइन परिक्षा घेण्यात विद्यापीठ यशस्वी झाले. सर्व सहयोगी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची पद्धती आहे. त्यामुळे अनेक आव्हानात्मक काम त्यांच्या कार्यकुशलतेने पार पडले आहेत. डॉ. कावळे यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात अध्ययनाचे काम केले असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी त्यांना चांगल्या अवगत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण सहजपणे होण्यास मदत होणार आहे. यामुळे विद्यापीठासह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा : 

सात अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तर एक पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

गडचिरोली जिल्हयात आज २०१ जणांनी कोरोनावर केली मात तर नवीन ४३ कोरोनाबाधीतांची नोंद

 

lead newsshriram kawale