पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली जन्मदात्या आईची हत्या..?

अहेरीतील धक्कादायक घटनेने गडचिरोली जिल्ह्यात एकच खळबळ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चूनारकर 

अहेरी (गडचिरोली) 19 ऑगस्ट :-  अहेरीत एका महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. निर्मला चंद्रकांत आत्राम असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी मुलगी उर्मिला चंद्रकांत आत्राम आणि तिचा प्रियकर रुपेश येनगंधलवार पोलिसांच्या ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अहेरीतील जुन्या तहसील कार्यालय परिसरातील घटना.

अहेरीतील जुन्या तहसील कार्यालय परिसरात राहणाऱ्या निर्मला आत्राम यांची त्यांच्या घरात गळा आवळून हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. निर्मला मूळची भामरागड तालुक्यातील रहिवाशी होत्या, २० वर्षांपूर्वी त्यांच्या पतीची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर त्या आपल्या मुलीसह अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरातील बेघर कॉलनी येथे राहत होत्या.

आज सकाळी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगी उर्मिला आणि उर्मिलाचा प्रियकर रुपेश येनगंधलवार यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणलेले आहे. पुढील कारवाई अहेरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने अहेरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी उर्मिला हीचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून उर्मिला हिचे पालनपोषण आईनेच केले होते. त्या प्राणहिता उप पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात रोजंदारीवर काम करून आपली आणि मुलीची उपजीविका करत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे वडीलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती. मात्र आंधळ्या प्रेमापोटी जन्मदात्या आईची हत्या केल्याच्या संशयावरून तिच्यावर गजाआड होण्याची वेळ आली आहे.

हे देखील वाचा :-  

मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

@spgadchiroliaherimuderaheripolice