‘मुख्यमंत्री असताना कुणाकुणाला धमकावलं हे सांगायला भाग पाडू नका’- धनंजय मुंडे

महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही, अशी सडकून टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केले आहेत. फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीतील मंत्र्यानं प्रत्त्युत्तर दिलं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदनगर डेस्क २८ नोव्हेंबर :- ‘एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नसेल, तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची पूर्वीपासूनच पद्धत आहे. त्या आधारावरच राज्याचे मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, त्याच्या तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप व व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,’ असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

आज नगरच्या सरकारी विश्रामगृहावर मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडेंनी फडणवीस यांनी केलेल्या, ‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत,’ या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले, त्यामध्ये त्यांनी धमकावणे कधी केले नाही. पण एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नाही, त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची पूर्वीपासूनची पद्धत आहे, त्याच आधारावर विरोधी पक्ष नेत्याने मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे सांगितले. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, ते तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप, व्हिडीओ क्लिप पाहिले. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,’ असा इशारा मुंडे यांनी फडणवीस यांना दिला. ‘भाजप किती ताकदवान आहे, हे येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसेलच,’ असे स्पष्ट करतानाच भाजपला एकप्रकारे आव्हानच दिले.