लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
देशाचे 14 वे पंतप्रधान व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या निधानानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : कठीण परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षण घेत ते विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. गुरूवारी रात्री त्यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते..उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. यांच्यामागे पत्नी गुरशरण कौर व तीन कन्या असा परिवार आहे.
गेल्या काही वर्षापासून ते प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्रस्त होते. त्यांना याआधी काही वेळा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी, भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा हे एम्समध्ये पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमी नंतर कर्नाटक मधील बेळगाव येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रद्द करण्यात आली असून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे है तातडीने बेळगावहून मध्यरात्रीनंतर दिल्लीला पोहोचले.
डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले असून त्यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला आहे. डॉ. मनमोहन सिंग साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मागनि अर्थव्यवस्थेला चालना दिली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे..त्यांच्यातील अर्थतज्ज्ञाने शेतकऱ्यांना संकटावर मात करता यावी म्हणून विदर्भासाठी खास पॅकेज तयार करून अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे उत्कृष्ट पंतप्रधान तर होतेच पण जगात उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचे नाव होते. अभ्यासू व अतिशय प्रामाणिक, विनम्र, शालीन व संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ अशा दहा वर्षात त्यांनी देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले होते. त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्यानंतर कृषी कर्जबाजारीपणाचा किती मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होतो हे त्यांना जाणवले. त्यामुळे ती राष्ट्रीय समस्या मानून त्यावर युद्धपातळीवर उपाय करणे गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्यातील अर्थतज्ज्ञाला शेतकऱ्यांसोबतच कर्जमुक्ती हा उपाय होता, २९ फेब्रुवारी २००८ मध्ये देशातील सर्वात मोठी ७१ हजार ६८० कोटीची कर्जमाफीची घोषणा त्यांच्याच नेतृत्वातील सरकारने केली. त्यांनी मांडलेले आर्थिक सिद्धांत व त्यांनी लावलेली आर्थिक शिस्त जगानेही स्वीकारली होती. पाश्चिमात्य देशामध्येही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी देशाला सावरण्यासाठी मोठे योगदान दिले. देशाची परकीय चलनाची गरज भागविण्यासाठी त्यांनी सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आली. त्यामुळे देशाच्या इतिहास त्यांना सदैव स्मरणात ठेवेल.
हे ही वाचा,
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश