लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट :
गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील साखरा गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास भरधाव टिप्परने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सात अल्पवयीन मुलांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सर्व मुले काटली (ता. गडचिरोली) येथील रहिवासी असून, सकाळी साडेचारच्या सुमारास साखरा गावाजवळील रस्त्याच्या कडेला पायी चालत असताना त्यांना ही धडक बसली. टिप्पर गडचिरोलीहून आरमोरीच्या दिशेने जात होता.
या अपघातात तन्वीर बालाजी मानकर (१६) आणि टिकू नामदेव भोयर (१५) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दूषण दुर्योधन मेश्राम (१४) आणि तुषार राजू मारबते (१४) या दोघांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्षितिज तुळशीराम मेश्राम, आदित्य धनंजय कोहपरे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करून हेलिकॉप्टरने नागपूरला रवाना करण्यात आली आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. टिप्पर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी वाहन व चालकाचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी अपघाताबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाकडून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खाटेची कावळ करून बनविली रुग्णवाहिका; ३ किमी जंगलपायपीट करीत मृत्यूपासून पळवले प्राण!