लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि,०९ जुलै: जिल्ह्यावर मुसळधार पावसासह गोसीखुर्द धरणाच्या भीषण विसर्गाचे दुहेरी संकट ओढावले असून, वैनगंगा नदीने रौद्र रूप धारण करत जनजीवन पुरतं विस्कळीत केलं आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अविरत पावसामुळे आधीच गडचिरोलीतील नद्या-नाले तुडुंब भरले असताना गोसीखुर्द धरणातून सोमवारी सुरू करण्यात आलेल्या ८,००० क्युमेक्स विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत मंगळवारी तो १२,५०० क्युमेक्सपर्यंत वाढविण्याचा आधीच इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. त्यातच पुन्हा वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांनी दुथडी भरून वाहत आजूबाजूच्या गावांचा संपर्क पूर्णतः तोडून टाकला आहे.
गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गासह गडचिरोली – चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, आरमोरी तालुक्यांतील २० प्रमुख मार्ग जलमय झाले आहेत. छोटे पूल, साखळी रस्ते, गावपायवाटी वाहून गेल्याने अनेक गावं अक्षरशः टापूप्रमाणे झाली आहेत.गोविंदपूर नाल्यावर पाणी ओसंडून वाहू लागल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून, गोगाव, पाल, वैनगंगा नद्या पूर ओसंडून परिसरात घुसल्या आहेत. देसाईगंज–कुरखेडा–मालेवाडा–कोरची–भिंपूर, वैरागड–कोरेगाव–रांगी–मागदा, चांदवड–चारभट्टी–नैनापूर आदी मार्ग पूर्णतः ठप्प झाले आहेत.
पावसाचा जोर इतका की केवळ देसाईगंज तालुक्यात २४ तासांत १६८ मिमी तर कोरचीमध्ये १४५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी शेकडो हेक्टर शेती जलमय झाली असून, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वीज, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि अन्नधान्य वितरणाच्या मूलभूत गरजा कोलमडल्या असून, संपूर्ण जिल्हा पुराच्या जबड्यात सापडल्याचे चित्र आहे.
याशिवाय, गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरण आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले असल्याने आगामी तासांमध्ये पूरस्थिती आणखी बिकट होण्याचा धोका आहे. प्रशासनाने नदी काठावरील तसेच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावागावांत सतर्क करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे रात्रीच्या दरम्यान दोन बस अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये गडचिरोली–आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे एका खाजगी बसमध्ये ५० प्रवासी अडकले होते. बस खोल पाण्यात अडकल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने तातडीने जेसीबी आणि हायवा पाठवून बचावकार्य सुरू केलं. दुसऱ्या घटनेत गडचिरोली–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गाढवी नदीच्या जवळ एक एसटी बस अडकली होती. इंजिनमध्ये पाणी गेल्याने बस बंद पडली व २३ प्रवासी अडकले. दोन्ही बस आपत्ती व्यवस्थापन दलाने यशस्वीरित्या बाहेर काढल्या असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्रवाशांना तात्काळ निवारा, जेवण आणि सुरक्षिततेसाठी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या बचावकार्यादरम्यान आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी आणि पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी स्वतः घटनास्थळी हजर राहून बचावकार्य पार पाडले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व नदीनाल्यांच्या प्रवाहावर लक्ष ठेवून संभाव्य धोका असलेल्या ठिकाणी पोलिसांमार्फत बॅरिकेटिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.
संपूर्ण जिल्हा सध्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात असताना, प्रशासनाच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. मात्र, ही केवळ निसर्गाची चेतावणी नसून, पुराच्या धोका असलेल्या जिल्ह्यांसाठी दीर्घकालीन आणि ठोस आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची निकड अधोरेखित करणारी घटना ठरते आहे.