माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क १९ नोव्हें :- देशाच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न, स्वर्गीय इंदिरा गांधींनी सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांतांच्या एकजुटीतून एक मजबूत, हिंसाचारमुक्त भारत घडविण्याचं स्वप्नं बघितलं होतं. इंदिराजींचं ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असं आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय इंदिराजींच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. स्वर्गीय इंदिराजींच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचं स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची शपथ घेत त्यांनी राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात माजी पंतप्रधान, स्वर्गीय इंदिराजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, उपसचिव ज. जी. वळवी आदी मान्यवरांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांसह सर्व उपस्थितांनी यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचं स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी तसंच ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कार्य करण्याची शपथ घेतली. आपापसातील सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संवैधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी देशाची स्वतंत्रता, एकता, अखंडता, सार्वभौमता टिकवण्यासाठी जीवनभर कार्य केलं. त्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांच्या कार्याचं व बलिदानाचं स्मरण करत असतानाच आपापसातील वाद, मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवण्याचा व संपूर्ण देश हिंसाचारमुक्त करण्यात आपलंही योगदान असलं पाहिजे. स्वर्गीय इंदिरा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचं तसंच स्वातंत्र्योत्तर काळात पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्याचंही त्यांनी स्मरण केलं. बांगलादेशची निर्मिती, बँकाचं राष्ट्रीयकरण, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचं नेतृत्वं करताना इंदिराजींनी बजावलेल्या भूमिकेचं स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.