लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तिघांमध्ये एक बैठक होईल. या बैठकीत हे तिघेही खातेवाटपावर चर्चा करतील.त्या नंतर कोणाला कोणतं खातं देतील ?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. यावेळी या तिघांमध्ये एक बैठक होईल. या बैठकीत हे तिघेही खातेवाटपावर चर्चा करतील. या चर्चेनंतर खातेवाटपाबद्दल घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे.
महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत. तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल, अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखातं अखेर भाजपला मिळणार असल्याचे बोललं जात आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे.