लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक: बुद्धांची भूमी असलेला भारत देश जगासाठी प्रेरणादायी असून आम्ही भारतात जेव्हा जेव्हा येतो तेव्हा भगवान बुद्धांच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यानंतर या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते त्यामुळे भारत देश हा जगासाठी प्रेरणादायी असून भगवान बुद्धांच्या प्रज्ञा शील करुणा, शांतीचा संदेश हा जगासाठी प्रेरक असल्याचे ज्येष्ठ भिक्खू आणि दक्षिण कोरियातील बौद्ध विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ली यांनी नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेणी आणि बौद्ध स्मारक येथे भेट देऊन निरीक्षण केले, त्यावेळी त्यांनी सांगितले.
दक्षिण कोरियातील सिस्टमंडळ नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी बौद्ध स्मारक येथे दाखल झाल्यानंतर नाशिकच्या बौद्ध अनुयायांनी त्यांचे पुष्प वाहून स्वागत केले, या शिष्टमंडळाने बौद्ध स्मारकातील भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून बुद्ध वंदना घेतली, त्यानंतर अडीच हजार वर्षा पूर्वीच्या ऐतिहासिक बोधी वृक्षाला वंदन केले. यानंतर माजी न्यायाधीश अनिल वैद्य, मिलिंद बनसोडे, डॉ. नानासाहेब खरे, अनिल गायकवाड यांनी शिष्टमंडळाचे पुष्पगुच्छ पंचशीलेचा गमचा आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण कोरियातील बौद्ध भिक्खू शिष्टमंडळ नाशिक शहरातील त्रिरश्मी बुद्धलेणीच्या अभ्यासासाठी आले आहेत. या शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ भिक्खू आणि दक्षिण कोरियातील बौद्ध विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ली. करत आहे. ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रखर अनुयायी असून त्यांनी ऑक्सफर्डमधून (यूके) शिक्षण घेतले आहे. त्यांचे वय ७० वर्षांहून अधिक असून बौद्ध धर्मात पीएचडी त्यांनी केली आहे. या शिष्टमंडळात प्रतिष्ठित दक्षिण कोरियाच्या गँगवॉन प्रांताचे माजी राज्यपाल किम जिन सून या शिष्टमंडळात असून ते बुचेऑन शहराचे महापौर आणि ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष होते. क्रेडिट आणि गॅरंटी फर्म, गँगवॉन प्रांताचे संचालक हान की सेओग आदींचा समावेश या शिष्टमंडळात आहे. या शिष्टमंडळाने नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेण्यांचे निरीक्षण केल्यानंतर दक्षिण कोरियाच्या गँगवॉन प्रांताचे माजी राज्यपाल किम जिन सून यांनी सांगितले की सम्राट अशोकाने भारतात ८४ हजार बुद्ध लेणी निर्माण केली असून या लेण्यांमध्ये कुशल कोरीव कामामुळे भगवान बुद्धांचा प्रेरणादायी ठेवा आजही आपल्याला पंचशील ची आठवण करून देत आहे. हे शिष्टमंडळ पहिल्यांदाच महाराष्ट्रातील बुद्ध विहार आणि लेणींचा अभ्यास करण्यासाठी हे शिष्टमंडळ भारतात आले आहे, लेणी अभ्यासक नितीन साळवे, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक असून ते या शिष्टमंडळाला लेणींची माहिती देत आहे.