सक्करदरा हद्दीत युवकावर गोळीबार; मित्रांवर संशय.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर, १९ नोव्हें :- आशीर्वाद नगर येथे एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आज बुधवारी दुपारी आढळून आला. तपासावरून त्याच्यावर गोळी झाडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही खळबळ जनक घटना सक्करदरा हद्दीतील आर्शिवादनगर येथे बुधवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास गॅस गोडावूनच्या गल्लीत घडली. उमेश ढोबळे (३५), रा. राहुलनगर, सोमलवाडा असे जखमीचे नाव आहे. प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो शहरातील हॉटेलमध्ये भाजीपाला पोहोचविण्याचे काम करतो.

या घटनेचा अद्यापही प्रत्यक्षदर्शी मिळालेला नाही. पोलिस त्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आशीर्वाद नगर येथे  दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास एका दुचाकी वाहनावर तिघे आले होते. त्यांनी आदर्शनगर, गॅस गोडावून जवळील एका गल्लीत वाहन पार्क केले. काही वेळातच उमेश जखमी झाला तर इतर दोघे घटनास्थळाहून पसार झाले. ती दुचाकी उमेशचीच असून दुचाकीजवळ तो रक्तबंबाळ स्थितीत पडून होता. दुपारच्या सुमारास गोळी चालण्याचा मोठ्याने  आवाज झाल्याची परिसरात चर्चा आहे. घटनास्थळाच्या दिशेने लोकांनी धाव घेतली. पाहता पाहता लोकांची गर्दी झाली. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक माने यांच्यासह सक्करदरा ठाण्यातील पोलिस पथक पोहोचले. जखमीला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मित्रांवर हल्ल्याचा संशय

घटनेतील जखमी युवक आणि आरोपी मित्र असल्याचे सांगितले जात आहे. तिघेही जखमीच्या दुचाकीवर आले होते. त्यांच्यात एका युवतीवरून वाद होता. यावर चर्चा करण्यासाठीच निघाले होते. मात्र, वाद विकोपाला जाताच उमेशच्या डोक्यावर गोळी झाडून आरोपी फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

nagapur crimenagpur police