लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, दि. १५ ऑगस्ट: दरवर्षी पालघर जिल्ह्यात दिनांक १४ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात जे स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले त्याच्या रक्ताने माखलेल्या जतन केलेल्या कपड्यांचे सन्मानपूर्वक पूजन केले जाते. यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित हुतात्म्यांचे स्मरण करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित,आमदार श्रीनिवास वनगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संदीप जाधवर, प्रांतअधिकारी धनाजी तुळसकर, तहसिलदार सुनिल शिंदे, विविध विभागाचे अधिकारी वर्ग, हुतात्मा यांचे नातेवाईक, नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती, आदिवासी पाडे या ठिकाणी उत्साहात झेंडा वंदन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात वसई तालुक्याचे योगदान फार मोठे आहे. १९४२ च्या चले जावं आंदोलनात हुतात्मा बाळा सावंत हा वीर वसई तालुक्यात पहिला हुतात्मा झाला.
यावर्षी त्याच स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आठवत वसई तालुक्यात आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र सरकारने केलेल्या ‘ हर घर तिरंगा ‘ या आवाहनास वसई तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिनांक १३ ऑगस्टपासून आज १५ ऑगस्ट पर्यंत सर्व शासकीय कार्यालये, शाळा,इमारतीवर तिरंगा लावण्यात आला.
आज तालुक्यातील सर्व शाळा, हौसिंग सोसायटी, महानगरपालिका, तहसील कार्यालय आदी ठिकाणी झेंडा वंदन करण्यात आले. अनेक शाळांमधून पदयात्रासहित, विद्यार्थांनी भाषणे, समूह गीत सादर केले. राष्ट्र गीत, ध्वज गीत गाऊन विध्यार्थी, शिक्षक यांनी आपले राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त केले. अनेक चाळी, सोसायटी मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकंदरीतच वसई तालुक्यातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
हे देखील वाचा :