लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
भंडारा : आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकांसह राज्यातील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सर्वात मोठे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणूका स्वबळावर लढू… असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
‘नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतय. मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गट अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झालं आहे. काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आघाडीच्या पराभवावरून मित्र पक्षांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर आज संजय राऊत यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर काँग्रेस मात्र बॅकफूटवर आली आहे. काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंच्या या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.