रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. १२ मे : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असतांनाच अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच या इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची चढ्या दरात विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश अमरावती शहर गुन्हे शाखेने केला आहे.

मागील काही दिवसांपासून हे रॅकेट मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने काल रात्री ११.०० वाजता पोलिसांनी छापेमारी करत तिवसा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे व भातकुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय राठोडसह यामध्ये अमरावती सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथील अटेंडन्स व  अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक महिला नर्स यासह २ खाजगी कर्मचारी अशा एकूण सहा जणांच्या मूसक्या पोलिसांनी आवळून त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी १० रेमडेसिवीर इंजेक्शन सह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एक टू व्हीलर बाईक, महिंद्रा बोलेरो, मारुती ब्रेझा व ६ मोबाईल असा एकूण १५ लाख १४ हजार रुपयांचा माल या आरोपींकडून जप्त करण्यात आला. दरम्यान या कारवाई मूळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. याचा पुढील तपास अमरावती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

याप्रकरणी आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्त सिंग यांनी सांगितले.

 

हे पण वाचा : घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

 

Amravati DistrictAmravati Policelead storyRemdesivir smugling case