लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उस्मानाबाद.दि,२० ऑक्टोबर : एल.सी. बी अधिकारी असल्याचे सांगत शेत मजुराला तब्बल २५ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब मध्ये समोर आला आहे. केज तालुक्यातील लाखा येथील शहाजी बाबू खंडाळे हे कळंब शहरात सोयाबीन काढणीच्या मजुरीची रक्कम घेण्यासाठी आले होते.
पैसे ते घेऊन गावी परतत असताना शहरातील होळकर चौक येथे एका महाठगाणे मी एल.सी.बी चा अधिकारी आहे तुम्ही तोंडाला मास्क का लावले नाही? तसेच शहरात गांजा विक्रीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे मला तुमची झडती घ्यायची आहे असं सांगत खंडाळे यांच्या खिशातील मजुरीचे पंचवीस हजार रुपये हातचलाखीने लंपास केले.
शहरातील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. दरम्यान खंडाळे हे कळंब पोलीसात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचे खंडाळे यांनी सांगितले आहे.