लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली,२५ : वन्यजीवांचा उपद्रव ग्रामीण भागांपुरता मर्यादित राहिलेला नाही, हे आज पुन्हा सिद्ध झालं. गडचिरोली शहरात अवघ्या रात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास दोन जंगली टस्कर हत्ती चक्क लांजेडा-इंदिरा नगरच्या मुख्य शहर मार्गावरून मुक्त संचार करताना दिसले. एरवी फक्त जंगल व आदिवासी वसाहतींमध्ये दिसणारे हे हत्ती गडचिरोलीच्या मुख्य मार्गावरुन जाताना दिसल्याने शहरवासीयांची झोप उडाली.
जंगलातला रस्ता सोडून शहरातले वळण!..
२५ मे च्या रात्री झालेल्या या प्रकाराने वनविभागासह स्थानिक प्रशासनाची झोप उडवली आहे. गडचिरोली-लांजेडा मुख्य मार्ग हा नेहमीच गाड्यांची वर्दळ असलेला आणि शहराच्या मध्यातून जाणारा प्रमुख मार्ग आहे. त्या मार्गावर दोन टस्कर हत्तींचा मुक्त संचार म्हणजे थेट शहराच्या हृदयात वन्यजीवांनी प्रवेश केल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. लांजेडा परिसरातून एका दुकानात नुकसान करून हे हत्ती पुढे चांदाळा, गुरवळा आणि वाकडीच्या जंगलांकडे गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.
हत्ती आता फक्त जंगलात नाहीत…
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींचा वावर सातत्याने वाढतो आहे. यापूर्वी ११ मे रोजी आरमोरी तालुक्यातील मानापूर गावात पहाटेच्या सुमारास दोन हत्ती मुख्य रस्त्यावरून चालत जाताना दिसले होते. त्यांनी वाटेत इंदिरा सहारे या महिलेला जखमीही केलं होतं.
त्या आधी कुरखेडा तालुक्यात, तसेच आरमोरीच्या सूर्याडोंगरी, जेप्रा, देलनवाडी, मानापूर आणि गडचिरोली तालुक्यातील महादवाडी, गुरवळा, वाकडी या भागांमध्येही हत्तींची उपस्थिती नोंदवली गेली होती. पण ते सर्व परिसर जंगल व ग्रामीण भागात मोडणारे होते. मात्र आता हे हत्ती गडचिरोलीसारख्या जिल्ह्याच्या प्रमुख शहराच्या हद्दीत पोहोचले आहेत, ही बाब खरोखरच चिंतेची आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे सावट, वनविभाग सजगतेच्या प्रतीक्षेत!..
गडचिरोली शहरात पहिल्यांदाच असे थेट हत्ती रात्रीच्या वेळी दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काहीनी या प्रकाराचे मोबाईल व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुदैवाने या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यापुढे अशी वेळ येऊ नये यासाठी वनविभागाने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
वन्यप्राण्यांचे जंगलातून शहरात येणे म्हणजे पर्यावरणीय असंतुलनाचे लक्षण आहे. वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून गस्त वाढवावी, तसेच संभाव्य मार्गांवर चेतावणी फलक लावून नागरिकांना सतर्क करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
शहरात वन्यजीवांची चाहूल – ही अपवादात्मक घटना, की नव्या वास्तवाची नांदी?..
गडचिरोली शहराच्या मुख्य मार्गावर हत्तींचा प्रवेश ही केवळ एक घटना म्हणून नोंदवता येणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये जंगलात बांधकाम, सडकेचे रुंदीकरण, खाण व्यवसाय, झाडांची कत्तल आणि मानवी हस्तक्षेप वाढत असतानाच वन्यजीवांच्या अधिवासावर संकट ओढवले आहे. त्यामुळे हे प्राणी अन्न, पाण्याच्या शोधात आता शहराच्या उपवेशांपर्यंत पोहोचू लागले आहेत.
प्रशासन सजग, पण उपाय धोरणात्मक हवेत..
सध्या हत्ती चामोर्शी रोड एचपी पेट्रोल पंप, रेड्डी गोडाऊन जवळून चांदाळा-गुरवळा-गंगाझरी मार्गे जंगलात परत गेले असले तरी, पुढील काही दिवस वनविभागाने सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी अशा वेळेस गोंधळ न उडवता शांतता पाळावी, वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
गडचिरोली शहरातील हत्तींची ही घटना जंगल आणि शहर यामधील सीमारेषा आता पुसट होत चालल्याचं स्पष्ट निदर्शक ठरत आहे.ही केवळ जंगलातली वार्ता उरलेली नाही — ही आता गडचिरोलीकरांच्या अंगणातली गोष्ट झाली आहे!
दोन टस्कर हत्ती शहरात आल्याची सकाळी तीन वाजता आल्याची माहिती होताच वन विभाग सतर्क होऊन हत्तीचे मार्ग बदलविण्यात यश आले आहे.एका ठिकाणी धान्य असल्याने नुकसान केलं आहे . त्यानंतर वनविभागाच्या अथक प्रयत्न करताच ते जंगलात चांडाळा मार्ग रवाना झाले आहे.
मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक गडचिरोली,