लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा दि.०६ मे : जिल्हात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याच्या माहितीवरुन बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 5 मे रोजी नांदुरा येथील गैबी नगर परिसरात धाड टाकून 3 आरोपींना अटक केली. यावेळी आरोपीकडून 10 रेमडेसीविर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडीसीवर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही लोक या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाइकांकडून जास्तीचे पैसे घेऊन त्यांना इंजेक्शन विकत देत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांचे नातेवाईक सुद्धा मिळेल त्या किमतीला हे इंजेक्शन विकत घेत आहे.
याच माहितीच्या पार्श्वभूमीवर 5 मे च्या संध्याकाळी 5 च्या दरम्यान नांदुरा येथील गैबी नगर मध्ये एलसीबीच्या पथकाने धाड टाकुन आरोपी आझाद खा इनूस खा (31) रा.गैबी नगर नांदुरा, अलबग हुसेन उर्फ नुरआलम अबुबकर अंन्सारी (30) रा. खुतरा जि. हजारीबाग (झारखंड), शे. इरफान शे. अजमत (20) रा. गैबी नगर, नांदुरा या तिघांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्याकडून 10 रेमडेसिवीर इंजेक्शन व 2 मोबाईल,असे एकूण 1 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील कारवाईसाठी आरोपींना नांदुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असले तरी या बुलढाणा जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार पुन्हा कुठे करण्यात आला आहे का याचीहि माहिती आरोपीकडून मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एलसीबीच्या पथकाच्या कारवाईने काळा बाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे, विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यापुर्वीच रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कार्रवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
हे देखील वाचा