जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, दोन जवान शहीद

शोपियान भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था, दि. १९ फेब्रुवारी :  जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत  दोन जवान शहीद झाले  आहे. तर एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. या वर्षी काश्मिर खोऱ्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलाचे हे पहिले मोठे नुकसान झाले आहे. चकमकीत जखमी झालेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला. संतोष यादव आणि रोमित तानाजी अशी दोन शहिद झालेल्या जवानांची नावे आहेत.

काश्मिर झोनचे पोलिस महानिरिक्षक विजय कुमार म्हणाले, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार १८ आणि १९ फेब्रुवारीला मध्यरात्री सुरक्षादल आणि पोलिसांनी चेरमार्ग, शोपियान येथे एक संयुक्त अभियान सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी त्या भागाला घेराव घालत  सर्च ऑपरेशन सुरु केलं आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

पुढे ते म्हणाले, सर्च ऑपरेशन दरम्यान जेव्हा सुरक्षा दल गौहर अहमद भट यांच्या घरी पोहचले. तेव्हा घर मालकाने  तपास यंत्रणेला खोटी माहिती दिली. घरात दहशतवादी असल्याची माहिती लपवली. जेव्हा सुरक्षादल चौकशी करत होते, त्यावेळी घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी झाले.  सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारा लष्कर ए तोयबाचा एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. कारावाईनंतर एक एके रायफल आणि एक बंदुकीसह दारूगोळा जप्त करण्यात आला. पोलिसांनी घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.