लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज केज सत्र न्यायालायत महत्त्वाची सुनावणी झाली. एसआयटीने दहा मुद्दे कोर्टात दिले होते, त्याआधारावर 10 दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टाने 7 दिवसांची 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटी कडून आज (बुधवार) कोर्टात मोठा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुरुवातीपासूनच हत्येचा मास्टरमाईंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आहे. हत्येनंतर 22 दिवसांनी तो सीआयडीला शरण आला. त्याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. खंडणी प्रकरणात त्याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर एसआयटीने कोर्टात महत्त्वाची माहिती सादर केली. आरोपीचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जवळचा संबंध असल्याचा दावा एसआयटीने केला. त्यालादेखील या प्रकरणात आरोपी बनवल्याचं एसआयटीने स्पष्ट केलं. तसेच वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केला. त्यामुळे प्रोडक्शन वॉरंटच्या माध्यमातून वाल्मिक कराड याचा ताबा घेण्याचा मार्ग एसआयटीला मिळाला. यानंतर वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केले. यावेळी एसआयटीने कोर्टात युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे दावे केले आहे.