अबब !! एकाच वेळी 42 डिलीव्हरी बॉय चिकन-फ्राईजच्या ऑर्डरसह चिमुरडीच्या दारात,फूड अ‍ॅपमध्ये झाला होता तांत्रिक घोळ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि ३ डिसेंबर: रेस्टॉरंटमधील जेवणाची होम डिलीव्हरी मिळवण्यासाठी फोन करायचा जमाना कालबाह्य होत चालला आहे. फूड डिलीव्हरी अ‍ॅपवर आता अवघ्या काही क्लिकसरशी दोन मिनिटांमध्ये ऑर्डर देता येते. फिलिपिन्समधील सात वर्षांच्या चिमुरडीनेही नेहमीप्रमाणे फूड अ‍ॅपवर चिकन आणि फ्राईजची ऑर्डर दिली. मात्र अ‍ॅपमध्ये झालेल्या तांत्रिक घोळामुळे सावळागोंधळ झाला आणि एक-दोन नव्हे, तर तब्बल 42 डिलीव्हरी बॉय आपापल्या रेस्टॉरंटमधून तीच ऑर्डर घेऊन तिच्या दारात हजर झाले.

फिलिपिन्स देशातील सेबू शहरात ही थक्क करणारी घटना घडली. सात वर्षांची चिमुकली आपल्या आजीसोबत घरी होती. दुपारच्या जेवणासाठी तिने फ्राईड चिकन आणि फ्रेंच फ्राईजची ऑनलाईन ऑर्डर दिली. फूड पांडा या फूड डिलीव्हरी अ‍ॅपवर ऑर्डर करण्याची टेक्नोसॅव्ही नातीला सवय असल्यामुळे आजीनेही त्यात लक्ष घातलं नाही. पण स्लो इंटरनेट आणि फूड अ‍ॅपमधील तांत्रिक घोळ आजी-नातीला चांगलाच मनस्ताप देणारा ठरला.

ऑर्डर दिल्यानंतर काही मिनिटांतच बरांगे माबोलो भागातील त्यांच्या घराबाहेरील निमुळती गल्ली दुचाकींनी भरुन गेली. अचानक आपल्या घराबाहेर फूड डिलीव्हरी बॉईजचा जथ्था का जमू लागला, असा प्रश्न दोघींना पडला. कदाचित आपल्या भागातील सगळ्यांनाच जेवण बनवायचा कंटाळा आला असावा आणि त्यांनी हॉटेलमध्ये ऑर्डर दिली असेल, अशी गंमतही त्यांना वाटली. मात्र सगळेच डिलीव्हरी बॉय एकामागून एक त्यांच्या घराकडे चाल करुन येऊ लागले आणि आजी-नात चक्रावल्या.

एका मागून एक प्रत्येक मिनिटाला 42 डिलीव्हरी बॉय घराबाहेर जमले. आता गल्लीतील शेजारी-पाजारीही चकित होऊन पाहायला लागले होते.

गडबड कुठे झाली?

त्याचं झालं असं, की स्लो इंटरनेटमुळे फूड पांडाचं डिलीव्हरी अ‍ॅप चालत नव्हतं. लहानशा मुलीला ते लक्षात आलं नाही, आणि ऑर्डर देताना वैतागून तिने एकामागून एक असं अनेक वेळा ‘ऑर्डर नाऊ’ बटणावर क्लिक केलं. मात्र प्रत्यक्षात यापैकी प्रत्येक वेळी अ‍ॅपवर ऑर्डर नोंदवली जात होती.

बिल 12 हजार 212 रुपयांचं 

खरं तर दोघींनी 189 फिलिपिनो पेसो म्हणजे अंदाजे 290 रुपयांची ऑर्डर दिली होती. मात्र तांत्रिक घोळामुळे चाळीसहून जास्त वेळा ती नोंदवली गेली आणि बिल झालं 7,945 फिलिपिनो पेसो म्हणजेच 12 हजार 212 रुपयांच्या वर. हा प्रकार समजल्यानंतर चिमुरडीला रडूच कोसळलं. आई-बाबांचं मोठं आर्थिक नुकसान तर झालंच, पण त्यांचे चिडलेले चेहरे तिच्या डोळ्यासमोर तरळले असतील. यापुढे ते कधीच आपल्याला हॉटेलमधून जेवण ऑर्डर करु देणार नाहीत, ही भीती तिच्या बालमनात डोकावली.

आजीचे शेजारी भले होते, म्हणून त्यापैकी काही जणांनी ती ऑर्डर विकत घेण्याची तयारी दर्शवली. एका शेजाऱ्याने तर फेसबुक लाईव्ह करुन आसपासच्या रहिवाशांना हातभार लावण्याचं आवाहन केलं. मात्र तीनशे रुपयांच्या ऑर्डरच्या नादात या कुटुंबाला काही हजार रुपयांचा फटका बसलाच.

पोलीस उपनिरीक्षकाचा विवाहित महिला शिपायावर विवाहाचे प्रलोभन दाखवत केला बलात्कार.