अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील

अहेरी तालुका कोविड-१९ नियंत्रण समितीची कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : अहेरी शहरात विना परवाना सुरु असलेल्या कोविड रुग्णालयाला तालुका कोविड नियंत्रण समितीने धाड मारून सील मारले आहे. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे अहेरी परिसरात खळबळ उडाली आहे.

अहेरी येथील पोलीस स्टेशन मार्गावर डॉ. अमोल पेशट्टीवार यांचे खाजगी रुग्णालय आहे. या ठिकाणी अनाधिकृतपणे कोविड पाँझीटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची गोपनीय माहिती तालुका कोविड नियंत्रण समितीला मिळाली. त्यानुसार समितीने त्या रुग्णालयाची तपासणी केली. त्या ठिकाणी दाखल असलेल्या ६ रुग्णांची कोविड टेस्ट केली असता एक रुग्ण हा कोरोनाग्रस्त आढळला. सर्व रुग्णांना अहेरी उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कोणत्याही खाजगी रुग्णालयात कोविड उपचाराची परवानगी नसतांना अनाधिकृतपणे उपचार करणाऱ्या पेशट्टीवार यांचे खाजगी रुग्णालयाला सील मारण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्याकडून अनाधीकृत कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली. त्यानंतर कोविड नियंत्रण समितीचे सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष भेट दिली असता त्याठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर कोविड नियंत्रण समितीने सदर अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला असून पोलीस स्टेशन अहेरी येथे तक्रार देण्यात आली आहे.

डॉ. कन्ना मडावी – वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय अहेरी    

हि कारवाई करतांना अहेरी चे तहसीलदार ओंकार ओतारी, वैदकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी, अहेरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वानखेडे अहेरी नगरपंचायत चे मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरी चे मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी कौसर पठाण, रोशन दरडे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

अहेरी येथील एका रुग्णालयात अनाधीकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याची गोपनीय माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली असतांना या प्रकारची शहानिशा करण्यासाठी तालुका कोविड नियंत्रण समितीने डॉ. अमोल पेशट्टीवार यांच्या रुग्णालयाची तपासणी केली असता. त्या ठिकाणी सहा रुग्ण आढळले. त्यांच्यावर कोविड चा उपचार सुरु होता. सर्वांची कोविड टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यामधील एक रुग्ण पाँझीटिव्ह आढळला व दोन रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी आढळली. सर्व रुग्णांना कोविड उपचारासाठी अहेरी उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे व डॉ. अमोल पेशट्टीवार रुग्णालयाला सील ठोकण्यात आले.

ओंकार ओतारी – तहसीलदार, अहेरी

Dr. Amol Peshattiwar HospitaDr. Kanna Madavilead story