कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिन्यांपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 15 डिसेंबर:- जानेवारीपासून मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे सरकार मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार करत असून यासंदर्भात तयारीही सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात आहे. अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं की, “मुंबई आणि महाराष्ट्राची कोरोना स्थिती हळूहळू पूर्वपदावर आलेली आहे. मला वाटतं की, लोकल सुरु होण्यासाठी आणखी थोडा वेळ जाईल. पण जानेवारीमध्ये लोकल सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “डिसेंबरचे साधारण 15 दिवसांमध्ये घटती कोरोनाची रुग्ण संख्या, तसेच नव्या रुग्णांची संख्या लक्षात घेतली जाईल. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत होती. ती आता निवळली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर नववर्ष, जानेवारीमध्ये आम्ही लोकल रुळावर आणू. तसेच सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल हा विश्वास आहे.”
३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली होती. कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला.