कोळी बांधवांनी दिले जाळ्यात अडकलेल्या व्हेल माश्याला जीवदान…

जाळे कापून व्हेल माश्याची सुटका करणाऱ्या मच्छिमारांचं सर्व स्तरातून होतंय कौतुक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर:-मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या पालघरमधील मुरबे गावातील कोळी बांधवांनी जाळ्यात अडकलेल्या व्हेल माश्याला जीवदान दिले आहे. आपल्या नुकसानीची पर्वा न करता बोटीचे मालक आणि खलाश्यांनी आपले जाळे कापून व्हेल माश्याची सुटका केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुरबे गावातील मिलन तरे हे आपली ‘वंदन साई’ नावाची बोट घेऊन मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. मासेमारीसाठी त्यांनी कविच्या खुंटाना जाळे लावले होते.

दुसऱ्या दिवशी बोटीवरील खलाशी जाळे ओढत असताना त्यांना जाळे फार वजनी लागत होते. जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासे लागल्याचा आनंद बोट मालक आणि खलाशयांना झाला होता. परंतु जाळे समुद्राच्या पाण्याबाहेर येताच जाळ्यात सुमारे पंचवीस ते तीस फुट लांबीचा व्हेल मासा अडकल्याचे दिसले.यावेळी बोट मालक मिलन तरे आणि खालाश्यांनी लगेचच कोयत्याच्या साहाय्याने महागडे जाळे कापून व्हेल माश्याची सुटका केली.जाळे कापल्याने बोट मालकाचे सुमारे अठरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुर्मिळ व्हेल माशाला जीवदान देणाऱ्या बोट मालकाला शासनाकडून जाळ्याच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागिकांकडून केली जात आहे.