कोरोना निगेटिव रिपोर्ट शिवाय महाराष्ट्रात नो एंट्री… पाहा नवीन नियमावली काय आहे..

महाराष्ट्र सरकारचा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय.

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातील प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २३ नोव्हें :- महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे किंवा रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. महाराष्ट्रात यायचं असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम असताना आता राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन बिगीन अगेन अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे.

राज्यात रुग्णसंख्या वाढली तर दुसरा लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा विचार असून आठ दिवसात आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं राज्यातील मंत्री विजय वड्डेटीवार यांनी याआधीच म्हटलं आहे.

इतर राज्यातून मुंबईत आणि राज्यात येणाऱ्या रेल्वे आणि विमान सेवा तात्पुरता थांबवण्याबाबत ही सरकार विचार करत आहे. रुग्णांची संख्या वाढत राहिली तर सरकार याबाबत कठोर निर्णय घेऊ शकते.

रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी….

  • दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांच्या शारिरीक तपासणीसाठी जिल्हाधिकारी राज्यांच्या सीमेवर व्यवस्था करतील.
  • कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जाईल. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना त्यांच्या राज्यात जावं लागणार आहे.
  • ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना महाराष्ट्रात पुढचा प्रवास करता येईल.
  • एखाद्याला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवलं जाईल.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी…

  • दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असावा.
  • महाराष्ट्रात प्रवासाला येण्यापूर्वी 96 तासांत त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करावी.
  • प्रवाशाकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसेल तर रेल्वेस्थानकांवर त्यांच्या शरीराचं तापमान तपासलं जाईल.
  • प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतील तरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जाईल.
  • ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांनी परत त्यांच्या राज्यात पाठवलं जाईल.
  • एखाद्याला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवलं जाईल.

विमानाने प्रवास करत असाल तर…

  • दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांनी आरटीपीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट सोबत आणणं बंधनकारक आहे. विमानतळावर या रिपोर्टची विचारणा करण्यात आल्यावर तो दाखवणं बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्रात येण्यापूर्वी 72 तासांत ही आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी
  • प्रवाशाने आरटीपीसीआर चाचणी केली नसेल तर विमानतळावर त्याची चाचणी करण्यात येईल. त्याचा खर्च प्रवाशालाच करावा लागणार आहे.
  • विमानतळावर कोरोना चाचणी केल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरच प्रवाशाला त्याची माहिती कळवली जाईल.
  • प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याच्याशी प्रोटोकॉलनुसारच व्यवहार केला जाईल.