शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता-राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदनगर डेस्क:- ‘राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले आहे, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता,’ असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. ‘कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी ती केवळ इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार समितीचा अहवाल आल्यावर पाहू,’ असेही ते म्हणाले. अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात वाढत्या वीज बिलावरून गोंधळ सुरू आहे. वीजबिल माफी वरून राज्यातील विरोधीपक्ष भाजप सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची जी घोषणा केली होती, त्यावरूनही विरोधक आता सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, ‘सरकार बनवताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला, त्यामध्ये असा कुठलाही विषय झाला नसल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे.

शंभर युनिट मोफत देण्याचा विषय कॅबिनेटमध्ये पडताळणी करून पाहण्यास सांगण्यात आले होते. ही वीज माफ करण्याची मंत्री राऊत यांची इच्छा आहे. त्यासाठी समिती देखील नेमली. पण या समितीचा अद्याप अहवाल आलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसाची परिस्थिती पाहता मी आता त्यावर मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही. समितीचा अहवाल आल्यावर सर्व स्पष्ट होईल. परंतु वीज मोफत देण्याची राऊत यांची इच्छा होती आणि त्यानुसार समितीचे काम सुरू आहे. मात्र सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन जो कॉमन मिनिमम प्रोग्राम केला आणि ज्या आधारावर हे सरकार बनले, त्यामध्ये असा कुठलाही विषय नव्हता. अर्थात इतर दोन्ही पक्षांना ते मान्य झाले आणि आर्थिकदृष्ट्या येणारा खर्च सरकारला झेपणारा असेल, तर ते आगामी काळात होऊ शकते,’ असेही तनपुरे म्हणाले.

बिलाच्या प्रश्नावरून सातत्याने राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांचाही तनपुरे यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘भाजपने सुद्धा त्यांच्या काळात ही सर्व परिस्थिती अनुभवली आहे. सरकारला सवलत देणे कितपत शक्य आहे, हे त्यांना माहिती आहे. परंतु कोणी कुठला मुद्दा उचलावा, हा त्या त्या पक्षाचा अजेंडा आहे. त्यामुळे त्याच्यावर मी जास्त बोलणे उचित ठरणार नाही,’असा टोलाही तनपुरे यांनी लगावला.

light billmaha vikas aghadimscb