लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. २६ जानेवारी: दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेता सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलिस दल) 15 तुकड्या दिल्ली आणि सीमावर्ती भागात तैनात केल्या जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात सुरू असलेली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक सुमारे दोन तास चालली. या बैठकीत आयबी संचालक आणि गृहसचिवांसह सर्व उच्च अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अनेक संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यास सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी अजूनही हिंसाचाराची शक्यता वर्तवली आहे.
हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, मुकरबा चौक आणि नांगलोआ परिसरातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लाल किल्ल्या जवळची परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळलेले नसल्याने मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश (एन्ट्री) आणि बाहेर येण्याचे दरवाजे बंद केले आहे. दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो स्टेशन, ग्रे लाइन येथील सगळे मेट्रो स्टेशन, जामा मस्जिद मेट्रो, दिलशाद गार्डन, झिलमिल और मानसरोवर पार्क मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे. काही आंदोलक आपापल्या सीमांवर परतत आहेत. पण लाल किल्ल्यावर आंदोलकांचा जमाव अजूनही कायम आहे.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते. पण, सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परिणामी संयम संपल्याने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते अपयशी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
दिल्लीत नेमकं काय घडलं ?
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सिंघू सीमा आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांना झुगारुन लावत दिल्लीत प्रवेश केला. ज्यानंतर बराच वेळ हे शेतकरी मुकरबा चौक इथं थांबलेले होते. पण, मग त्यांनी बॅरिगेट आणि सीमेंटचे अवरोधक तोडण्याचा प्रयत्न केला. मुकरबा चौकात पोलिसांनी बेभान शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी म्हणून पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.
काही शेतकऱ्यांनी दिल्ली पोसील मुख्यालयाबाहेर जबाबदारी बजावणाऱ्या पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. काही वाहनांची तोडफोडही येथे करण्यात आली. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतरही शेतकरी आंदोलकांनी अतिशय आक्रमक स्वरुपात लाल किल्ला गाठला. इथं त्यांनी मोठमोठ्यानं घोषणा देण्यासही सुरुवात केली.