LoCवर पाकशी लढताना महाराष्ट्राला दोन वीरपुत्र शहीद.

ऐन दिवाळीत काश्मीरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राला दोन वीरपुत्र गमवावे लागले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: पाकिस्तानने ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना नियंत्रण रेषा भागात गोळीबार केला असून त्यात शहीद झालेल्या तीन जवानांपैकी दोन जवान महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर आणि नागपूर येथील दोन जवानांना काश्मीर येथे सुरू असलेल्या धुमश्चक्रीत वीरमरण पत्करावे लागले आहे.

नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, दोन जवान या धुमश्चक्रीत शहीद झाले आहेत तर सहा नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. श्रीनगर येथील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांमधील दोन जवान महाराष्ट्रातील आहेत. नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढतान वीरमरण आले आहे.

ऋषिकेश हा जवान अवघ्या २० वर्षांचा होता. कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी हे त्याचे गाव असून ऋषिकेशच्या निधनाची बातमी गावात येताच संपूर्ण बहिरेवाडी पंचक्रोशीवर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. ऋषिकेश हा ६ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होता. ११ जून रोजी त्याने ड्युटी जॉइन केली होती. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्याची भारतीय लष्करात भरती झाली होती. त्याला एक लहान बहीण असून ऋषिकेशच्या निधनाने दु:खाचा डोंगरच जोंधळे कुटुंबीयावर कोसळला आहे. दरम्यान, ऋषिकेशचे पार्थिव उद्या रात्रीपर्यंत गावात पोहचेल असे सांगण्यात आले आहे.

भूषण रमेश सतई हा जवान नागपूर जिल्ह्यातील काटोल निवासी शहीद झाला. 28 वर्षीय भूषण सतई गेल्या 9 वर्षांपासून भारतीय सैन्यातील 6 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. देशभक्तीने ओतप्रोत असलेला भूषण नेहमीच पुढे जात शत्रूचा सामना करीत असे. लढवय्या वृत्तीचा अन्‌ न डगमगणारा असा माझा मुलगा देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाला, हे ऐकून धक्का बसला आहे. परंतु देशासाठी प्राणपणाने लढणार्‍या भूषणवर मला गर्व असल्याचे मोठ्या अभिमानाने त्याचे पिता रमेश सतई यांनी म्हटले आहे.रमेश सतई हे मजुरीचे काम करतात. लहानपणापासूनच भूषणला सैन्याची ओढ होती. त्यानुसार तो सैन्यात भरती झाला होता. हाच भूषण सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झाल्याची वार्ता काटोलमध्ये येताच सर्वत्र खळबळ उडाली. अनेकांनी सतई कुटुंबीयांची भेट घेत त्यांना सांत्वना दिली. ऐन दिवाळीत कर्ता मुलगा असा गेल्याने फैलपुरा काटोल निवासी सतई कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.