लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. ५ डिसेंबर: बुलढाणा येथील चिखली मार्गालगत शासकीय मुलांचे निरीक्षण व बालसुधारगृह आहे. या ठिकाणी विधीसंघर्षग्रस्त बालकांना ठेवण्यात येते. या बालसुधारगृहाच्या खोलीत एकूण तीन मुलं होती. त्यातील दोघांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. नेमक्या कोणत्या कारणांनी या दोन मुलांनी आत्महत्या केली ही बाब स्पष्ट झालेली नाही.
आज शनिवारी पहाटे ४ वाजता दोन मुलांनी टॉवेल आणि बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी तिसरा मुलगा हा झोपलेल्या अवस्थेत होता. सकाळी जेव्हा तिसऱ्या झोपलेल्या बालगुन्हेगाराने हा प्रकार पहिला, तेव्हा त्याने आरडाओरड केली आणि सर्व कर्मचारी जमा झाले. या घटनेमुळे बुलढाणा शहरात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली व पंचनामा केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, तहसीलदार खंडारे पोहोचले असून या मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे यांची सध्या चौकशी सुरु आहे.