अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले “ माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद.

चार पाच नेत्यामध्ये माझे नाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात  एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान  विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी  मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, असे  वादग्रस्त विधान केले आहे .तर हे किरकोळ लोक माझे काय करणार, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे  निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत.  अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे जाहीर सभा घेतली. त्या  सभेत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर टीका केली आहे.

सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन जाती पातीवर मतं मागत आहेत. “मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो. महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझं नाव आहे. पण काही लोक त्यामुळे माझ्यावर जळतात”, असे अब्दुल सत्तार म्हणाले. “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. हे किरकोळ लोक माझ्याशी काय सामना करणार आहेत. मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची काम केली आहेत. जो विकास कामे करतोय, त्याला मतदान करा”, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले.

जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ अशी ओळख आहे. अब्दुल सत्तार यांनी तीन वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करून  विजय मिळवला असून. विद्यमान मंत्री सुद्धा आहेत.ते  या मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता  चौथ्यांदा आमदार व्हायचंय, यासाठी ते जाहीर सभा घेत प्रचार करताना दिसत आहेत.