लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १ नोव्हेंबर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेबाबत स्वतःहून (सुमोटो) दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध थेट कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत कलम १५० ते १५२ नुसार कारणे दाखवा नोटीस बजावून आज सुनावणी घेण्यात आली.
महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असतानाही रस्त्यांची झालेली दुरवस्था ही सार्वजनिक सुरक्षेवरील गंभीर तडजोड असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. “गुणवत्तेचा अभाव आणि निष्काळजीपणा याबाबत कोणतीही गय केली जाणार नाही. सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी अपरिहार्य आहे,” असे पंडा यांनी नमूद केले.
या कारवाईतून प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, रस्ते, पूल, आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा या केवळ कंत्राटी जबाबदाऱ्या नसून त्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुरक्षा घटक आहेत. पुढील काळात अशा प्रकरणांमध्ये नियमितपणे सुनावणी घेऊन कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.