केमिकलद्वारे पिकविली जातात केळी अन् इतर फळे.
अन्न व औषध प्रशासन झोपेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
तेल्हारा, अकोला 10 जानेवारी:- भाज्या, फळावर फवारण्यात येणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशक औषधांमुळे कळत नकळतच या कीटकनाशकांचा अंश माणसाच्या पोटात जातच असतो. मात्र केळी व इतर फळे केमिकलद्वारे भयानक पद्धतीने पिकविण्याचा धंदा तेल्हारा तालुक्यात व परिसरात राजरोसपणे सुरू असून हा जीवघेणा शॉर्टकट घातक ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध निरीक्षकांचे याकडे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तेल्हारा भागात केळी पारंपरिक पद्धतीने भट्टी लाऊन पिकविण्याऐवजी रसायनाद्वारे पिकविली जात असल्याचे वास्तव आहे. चारही बाजूंनी बंदिस्त असणार्या घरात केळीची भट्टी लावल्यानंतर साधारण 8 ते 12 दिवसात नैसर्गिक केळी पिकते. या केळींचा रंग आणि चवही अप्रतीम असते. पिकल्यावर पिवळसर-करड्या रंगावर छोटे-छोटे ठिपके पडतात. चवीने गोड लागणार्या या केळांना पिकविण्यासाठी 8 ते 12 दिवस लागत असल्यामुळे आणि तोपर्यंत बाजारभावाचा अंदाज नसल्यामुळे रसायनात बुडवून केळी झटपट पिकविण्याचा शॉर्टकट जीवघेणा धंदा काही धंदेवाईक व्यापारी व व्यापार्यांकडून अवलंबला जात आहे.
रसनायनात बुडवून पिकविलेली केळी विक्रीसाठी केवळ 3 दिवसात तयार होते. परंतु ही केळी चवीने आंबट लागते. वास्तविक रसायनात बुडवून पिकविलेली केळी ही पक्व झालेली नसते, तर केवळ सालीला बाहेरून पिवळाधमक रंग आल्यामुळे दिसण्यास आकर्षक आणि पूर्ण परिपक्व झालेली असल्यासारखी दिसतात.
अर्धपक्व आणि रसायनात बुडविलेली केळी खाल्ल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. झाडावरून केळीचे घड कापून काढताना अनेकदा कच्च्या केळांना विण्व लागत असतो. ती विळा लागून कापली गेलेली केळी तशीच रसायनात बुडविल्यामुळे साहजिकच हे घातक रसायन केळाच्या आतमध्येही जाते, परिणामी खाताना केळाबरोबरच विषही आपल्या पोटात जाते.
हिच परिस्थिती इतर फळांची असते. अशा पद्धतीने पिकविलेल्या केळी व इतर फळांना खाण्यायोग्य होण्यासाठी लागणारा पुरेसा कालावधी न मिळाल्याने पिकविण्याच्या या पद्धतीमुळे फायदा मिळतही असेल, मात्र त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. वरवर साध्या वाटणार्या, मात्र तितक्याच गंभीर असणार्या या प्रकारामुळे अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक खाते लक्ष देणार का? हा प्रश्नच आहे.