अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 05 जुले – रस्ता सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. रत्यावर होणारे अपघात व मृत्यु हे मानवनिर्मित असून ते आपण टाळू शकतो. यासाठी सर्वांनी वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन भवन येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्यासह विद्यार्थी, त्यांचे पालक, आटो-रिक्षा संघटनेचे सदस्य आदी उपस्थित होते.

अपघातामुळे होणा-या मृत्युची संख्या आपल्या देशात जास्त आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, रस्त्यावरीच सुरक्षा अतिशय आवश्यक आहे. अपघातात विनाकारण मृत्यु झाला तर संपूर्ण कुटुंब पोरके होते. ही मानवनिर्मित आपत्ती आहे. नियमांचे पालन केले तर ही आपत्ती आपल्याला टाळता येऊ शकते. रस्ता सुरक्षा सर्व समाजासाठी एक अभियान आहे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचा भंग होणार नाही तसेच आपल्यामुळे अपघातात कोणी जखमी किंवा कोणाचा मृत्यु होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी महानगर पालिका आयुक्त पालीवाल म्हणाले, भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. रस्त्यावरील अपघात ही नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आपत्ती आहे. वाहतूक नियमांची माहिती नसणे किंवा जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करणे, हे अतिशय गंभीर आहे. आजचे विद्यार्थी हे भविष्यात वाहन चालविणार आहे. त्यामुळे त्यांना शालेय जीवनापासूनच वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. परिवहन कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेत अतिशय चांगली माहिती आहे. हे नियम शाळेत वाचून दाखविणे गरजेचे आहे. कारण शाळांमधून केवळ विद्यार्थीच नाही तर व्यक्तिमत्व घडले पाहिजे. रस्ता सुरक्षा संस्कार हे शाळेतूनच विद्यार्थ्यांच्या मनात रुजले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी  मोरे म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी राबविण्यात येते. रस्ता सुरक्षेची माहिती व जनजागृती करण्यासाठी विभागाच्या वतीने संपूर्ण तालुका स्तरावर निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांनी रस्ता सुरक्षाबाबत चांगला संदेश दिला आहे. सन 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये जिल्ह्यात अपघातांची संख्या 20 टक्क्यांनी कमी झाली. रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे. रस्ता सुरक्षा ही एक सामाजिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा नियम पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियमांचे फलक शाळांना वितरीत करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांनी चित्रकला स्पर्धेतील आकर्षक चित्रांची पाहणी केली.

स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वाटप : प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातून शाळा स्तर, केंद्र स्तर आणि तालुका स्तरातून जवळपास 4800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात निबंध स्पर्धेत प्रथम साची दुर्योधन, द्वितीय श्रध्दा वाघ, तृतीय हंसिका गेडाम तर चित्रकला स्पर्धेत केतकी किनेकर प्रथम, साची दुर्योधन द्वितीय आणि रचना नवले तृतीय आली. याशिवाय प्रत्येक तालुकानिहाय सुध्दा दोन्ही स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले.