लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभादरम्यान त्रिवेणी संगमावर कोट्यावधी भाविक पवित्र स्नान करत आहेत. मात्र ज्यांना याठिकाणी जाणं शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या दर्शनाची अनुभूती घेता यावी, यासाठी महाकुंभातलं हजारो लिटर पवित्र जल नागपूर आणण्यात आलं आहे. व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं हे संगम जल आणण्यात आलं असून, नागपुरात रेशीमबाग मैदानावर भव्य दिव्य अध्यात्मिक वातावरणात आज आणि उद्या या पवित्र जलाचा वर्षाव भाविकांवर केला जात आहे.
या समारंभात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सहभाग घेत महाआरती केली तसंच जलाची पूजा करून दर्शन घेतलं. उद्या या महाआरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. यासाठी दोन या मैदानावर दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती संगीत, सत्संग, किर्तन, भजन, प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच प्रसिद्ध ब्रम्हवृंदाद्वारे ‘शिवशक्ती याग’, संतांच्या पादुका आणि जलकुंभ अभिषेक, पवित्र जलाभिषेक अशा कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.