लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वसई/ 28ऑक्टोबर
आदिवासी- कातकरी ढोर नाय माणूस हाय” अश्या गोषणा देण्याची वेळ आज पुन्हा आली आहे त्याचं कारणही तसंच आहे. ‘महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळा’मार्फत पनवेलमध्ये वाटप होत असलेला तांदूळ अळ्या पडलेला, सडका व अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वाटप थांबवत, पोलिस व सरकारी अधिकाऱ्यांच्या साक्षीने या तांदळाचा पंचनामा केला आहे. त्यामुळे “आदिवासी ही माणसं आहेत जनावरे नाहीत” असे सरकारला सांगण्याची वेळ आली असून, या आदिवासींना जनावरे देखील खाणार नाहीत अशा तांदळाचे वाटप आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येत असलेल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या घोटाळेबाज आदिवासी विकास महामंडळाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. पंडित यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या वाकडेवाडी येथे आदिवासी विकास महामंडळ कार्यालय, जव्हार यांच्यामार्फत आदिवासी कातकरी या आदिम जमातीच्या कुटुंबांना वाटप करण्यासाठी 5200 किलो तांदूळ वाकडी येथील अनुदानित आश्रम शाळेत आणला आहे. परंतु सदर तांदूळ अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याची श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तांदळाची पाहणी केली. आदिवासी विकास महामंडळाकडून वाटपासाठी आलेल्या तांदळामध्ये अळ्या पडलेल्या, सडका, जाळ्या, मोठ्या प्रमाणात खडे आढळून आले. यावेळी विचारणा केली असता, सदर तांदूळ पुन्हा पॉलिश (re polish) करून आणला असल्याची कबुली आदिवासी विकास महामंडळाचे प्रतिनिधी श्री ए व्ही सोनवणे यांनी दिली. परंतु या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात खडे व तांदळाचे तुकडे (कणी), अळ्या आढळल्याने सदर तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या वाहनावर ‘महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग खावटी वितरण योजना 2020-21’ असे लिहिलेले आढळले. या अगोदरही आदिवासी विकास महामंडळ आणि ग्राम साथींच्या. मार्फत दिनांक 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी अशाच प्रकारचा निकृष्ट तांदूळ 144 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 20 किलोप्रमाणे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांकडे चौकशी केली असता, “आम्हाला मिळालेल्या तांदूळ हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असून, तो आम्ही शिजवून खाऊ शकत नाही व तो तसाच शिल्लक आहे” अशी माहिती लाभार्थ्यांकडून देण्यात आली.
विशेष म्हणजे, आदिवासी विकास महामंडळाकडून या अगोदरही दि. ७ ऑक्टोबर, २०२० रोजी भिवंडी ग्रामीण भागातील चिंबीपडा, खडकी, लाखीवली, जुनांदुरखी व कांबे येथील गावातील आदिम (कातकरी ) जमातीच्या कुटुंबांना असाच आळ्या पडलेला, अतिशय निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप करण्यात आला होता. याविरोधात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास महामंडळ कार्यालय शहापूर यांच्यासमोर तीव्र आंदोलन केले होते. तसेच या प्रकाराची तक्रार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे तक्रार केली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्यपालांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या आदिवासी विकास महामंडळावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व राज्यस्तरीय आदिवासी शेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला आहे.
पनवेल मध्ये वाटप करण्या साठी आणलेल्या तांदळाचा पंचनामा करण्यासाठी वाकडी पाडा येथील तलाठी, पोलीस, आदिवासी विकास विभागाचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हिरामण भाऊ नाईक, हिराताई पवार,बाळू वाघे,भगवान वाघमारे,कुंदा पवार, व इतर कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते. पकडण्यात आलेला तांदूळ तापसणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक यांनी दिली.