लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १५ :जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या उत्पादन-वितरणाच्या वाढत्या प्रवृत्तीवर निर्णायक प्रहार करत गडचिरोली पोलिसांनी आज मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई केली. कुरखेडा उपविभागातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत मौजा हुर्यालदंड येथील एका घराच्या सांदवाडीत काळजीपूर्वक लपवून ठेवलेली गांजाची अवैध लागवड आणि साठा पोलिसांनी उघडकीस आणला. या धाडीत २३९.६६ किलो गांजा — बाजारमूल्य रु. १,१९,८३,००० — असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पोस्टांना अंमली पदार्थविरोधी मोहिमेचे स्पष्ट आदेश…
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला थोपवण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोक्पल यांनी काही दिवसांपूर्वीच सर्व पोस्टे, उपपोस्टे आणि पोमके प्रभारी अधिकाऱ्यांना गैरकायद्याने पसरत असलेल्या ड्रग नेटवर्कवर कठोर आणि सातत्यपूर्ण मोहिम राबविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या निर्देशानंतरच आजची ही कारवाई शक्य झाली असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
गोपनीय माहिती, अचूक पाहणी आणि शिस्तबद्ध धाड….
14 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कृष्णा हरसिंग बोगा (वय 41) हा आपल्या घराच्या सांदवाडीत गांजाची लागवड करीत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानंतर कोणतीही ढिलाई न ठेवता पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले.
कायद्याने निर्धारित सर्व प्रक्रिया, पंचनामा आणि सीलिंग पद्धतींचे काटेकोर पालन करून घेतलेल्या झडतीत कॅनबिस वनस्पती, हिरवी पाने, फुले, बी अशा मोठ्या प्रमाणात सामग्री मिळून आली. वजन प्रक्रिया पूर्ण होताच २३९.६६ किलो अंमली पदार्थ आढळला—जे जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या जप्तींमध्ये गणले जाते.
एनडीपीएस कायद्यान्वये गंभीर गुन्हा नोंद…
अंमली पदार्थ विक्रीसाठी तयार केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी कृष्णा बोगा याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(सी), 20(बी), 20(बी)(त्त)(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोमके मालेवाडा येथील उपनिरीक्षक आकाश नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
संयुक्त पथकाची उच्च दर्जाची समन्वयक कामगिरी…
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनी समाधान दौंड, पोअं/रोहित गोंगले, पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे, चापोअं/गणेश वाकडोतपवार, पोहवा/संतोष नादरगे आणि पोअं/नितेश सारवे यांनी उत्कृष्ट समन्वय साधत धडक कारवाई केली.
जिल्ह्यातील ड्रग-नेटवर्क तोडण्यासाठी पोलीस ठाम….
गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात माओवादी कारवायांबरोबरच अंमली पदार्थांची वाढती सावली ही नवी चिंता बनत असताना, पोलिसांनी उचललेले हे कडक पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
पोलिसांनी अशा कारवाया सातत्याने आणि अधिक कठोर पातळीवर सुरू राहतील, असे स्पष्ट संकेत दिले असून, जिल्ह्यातील अंमली पदार्थ व्यवहाराच्या मुळावर घाव घालण्याची ही मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे समजते.