सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारची चाचपणी, रेल्वेला पत्र.

सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्टच आहे. सरकारने सध्या फक्त शक्यतांवर प्रतिसाद मागितला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नसून रेल्वे मंत्रालयाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. (State Government writes to Railway Ministry on resuming Mumbai Local service for ordinary people)

कोव्हिडशी संबंधित सर्व काळजी घेऊन सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. त्यासाठी विविध टप्प्यांत वेळा निश्चित करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

कसे असतील टप्पे?

दिवसभरात 3 टप्प्यांत प्रवासाची परवानगी देण्याची विचारणा
सकाळी 7.30 पासून सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती
सकाळी 8 ते साडेदहा पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी
सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती
संध्याकाळी 5 ते 7.30 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी
रात्री 8 ते शेवटच्या लोकलपर्यंत सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती
महिलांसाठी दर तासाला एक लोकल देण्याची विनंती

mumbai life linemumbailocal