महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प देशात अव्वल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहमदनगर, दि. ६ मे :महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प हा शिक्षण, संशोधन, विस्तार, वित्त व्यवस्थापनात सरस ठरुन देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. या प्रकल्पातंर्गत कोव्हिड-19 च्या लॉकडाऊन काळामध्ये १८४ ऑनलाईन सत्र घेण्यात आले आहे.

या प्रकल्पाद्वारे फळबागांच्या फवारणीसाठी रोबोट विकसीत केलेला आहे. या प्रकल्पाद्वारे बुचकेवाडी, बाबुर्डी घुमट आणि शेटफळे हि गावे स्मार्ट व्हिलेज म्हणुन विकसित केले आहे. या प्रकल्पात ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर यावर मोठे संशोधन हाती घेण्यात आले आहे.

या प्रकल्पाद्वारे डिजिटल शेती आणि स्मार्ट व्हिलेज हि संकल्पना प्रत्यक्षात आमलात येत आहे. या कास्ट प्रकल्पाच्या टिमच्या अविरत परिश्रमामुळे या प्रकल्पाला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी.पाटील यांनी दिली.

जागतिक बँक अर्थसहाय्यित,भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली अंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे असलेल्या हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञानाची (कास्ट) वार्षिक आढावा बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. हा प्रकल्प देशभरात १४ राज्यांमध्ये राबविला जात आहे. प्रकल्प अहवालचे सादरीकरण या प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.

या वार्षिक आढावा बैठकीला उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर.सी. अग्रवाल, नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. पी. रामासुंदरम, परिक्षण व मुल्यमापन आणि पर्यावरण शाश्वतीचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. हेमा त्रिपाठी, नाहेपचे संचालक डॉ. कुमार राजेश, जागतिक बँकेचा चमु, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु ऑनलाईन उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट प्रकल्पातंर्गत कोव्हिड-१९ परिस्थितीत पाच आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, ४६ राष्ट्रीय प्रशिक्षणे, २७ राष्ट्रीय कार्यशाळा, १९ वेबिनार्स, ७३ तंज्ञ व्याख्याने, १४ प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये २५५३६ शिक्षक/शास्त्रज्ञ आणि २९४३५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. हवामान अद्ययावत शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान या विषयांवरील व्याख्याने व प्रशिक्षणाचा ६१६८ शेतकर्यांना लाभ झाला आहे. या कास्ट प्रकल्पातंर्गत शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर यावर मोठे काम केले आहे. या प्रकल्पाने फळबागांच्या फवारणीसाठी विकसीत केलेल्या रोबोटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये नवी दिल्ली येथील कृषि व शेतकरी कल्याण विभागांतर्गत आझादी का अमृत महोत्सव या सदराखाली किसान ड्रोनला प्रोत्साहन देणे: समस्या, आवाहने आणि पुढील मार्ग या विषयांवार एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री ना. श्री. नरेंद्रसिंह तोमर, केंद्रिय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री ना.श्री. कैलास चौधरी, कृषि सचिव श्री. मनोज आहुजा, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, सह.सचिव श्रीमती शोमिता बिस्वास उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कृषि क्षेत्रात ड्रोनचा वापर: संधी आणि आवाहने या विषयावर सादरीकरण केले. केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण विभागातंर्गत भुमापन आणि पीक अन्नद्रव्य मुल्याकंनाकरीता ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) बनविण्याच्या समितीचे सदस्य म्हणुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कृषी विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प देशात प्रथम आल्याने विद्यापीठाच्या प्रकल्पाचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. या प्रकल्पाच्या यशामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी.पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, नियंत्रक श्री. सुखदेव बलमे, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

lead news