धानोऱ्यात ५ हजाराची लाच घेतांना हत्तीरोग विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,ता.१०: ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज धानोरा येथील हत्तीरोग अधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक प्रभाकर लांडगे(५६) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडला.   

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या कर्मचाऱ्याचे वैद्यकीय रजेचे बिल मंजुरीकरिता वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाचे होते. तसेच त्याचे मासिक वेतन व दिवाळी अग्रीम रक्कमही मंजूर करावयाची होती. त्यासाठी सहायक अधीक्षक प्रभाकर लांडगे याने तक्रारकर्त्यास ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज या विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानोरा येथील हत्तीरोग अधिकारी कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारकर्त्यांकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रभाकर लांडगे यास पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक यशवंत राऊत यांच्या नेतृत्वात हवालदार प्रमोद ढोरे, शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनी तावाडे, सोनल आत्राम यांनी ही कारवाई केली.